यवतमाळ : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ४६ व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे राज्यातील प्रयोगशील १३ शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठानतर्फे कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी बोलताना पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील.
त्याचबरोबर पुसदच्या माळ पठारावरील दुष्काळग्रस्त ४० गावांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून दुष्काळमुक्त करण्याचे वचन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले.
दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांचा ‘सातबारा कोरा’ करण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे शासन स्तरावर कर्जमाफीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
धाराशिव येथे शेती नुकसान पाहणीसाठी आलेल्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही शेतकरी कर्जमाफी बाबत भूमिका स्पष्ट केली. “ मी स्वतः शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहित आहेत. कर्जमाफीची नितांत गरज आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील,” असे ते म्हणाले.
राज्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी अधिक तीव्र होत आहे. आता सरकार लवकरच कर्जमाफी संदर्भात मोठा निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
——————————————————————————————————-



