मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता मोठा आणि निर्णायक निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना फेस ॲप आणि जिओ-फेन्सिंग प्रणालीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगड जिल्ह्यातील आढावा बैठकीदरम्यान यासंदर्भातील आदेश दिले.
ऑगस्टपासून नव्या प्रणालीची सक्ती
तलाठी ते उपजिल्हाधिकारी पदावरील सर्व कर्मचाऱ्यांना आता फेस ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक असेल. ऑगस्ट महिन्याचा पगार (सप्टेंबरमध्ये मिळणारा) फक्त आणि फक्त फेस ॲपवर नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या नव्या प्रणालीअंतर्गत जिओ-फेन्सिंगद्वारे कर्मचाऱ्यांची उपस्थिती संबंधित कार्यालय किंवा कार्यक्षेत्रातूनच नोंदवावी लागेल.
नोंदणी नसेल तर गैरहजेरी
जर एखाद्या कर्मचाऱ्याने फेस ॲपवर दररोज उपस्थितीची नोंद केली नाही, तर ती गैरहजेरी म्हणून नोंदवली जाणार आहे. त्यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी यांसारख्या सर्व पदांवरील कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात हजेरी लावणे अनिवार्य असणार आहे.
प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न
शासनाच्या म्हणण्यानुसार, या नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कार्यालयीन शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढेल. यामुळे अनेकदा क्षेत्रात असल्याचे कारण देऊन कार्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येईल.
महसूल विभागातील कर्मचारी आणि प्रशासनाने नवीन नियमांचे तातडीने पालन करावे, अन्यथा वेतन थांबवण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच, न्यायालयीन प्रक्रियेतील पुढील घडामोडींसाठी सरकार सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.
————————————————————————————–



