प्रसारमाध्यम डेस्क
मरण आले तरीही थांबू नको,
एक झुळूक हो तू प्रकाशाची,
डोळे गेले तरीही बघ तू,
कथा लिहू शकतोस नवजीवनाची..
आपण मेल्यानंतरही थांबू नये. आपले आयुष्य जरी संपले, तरी आपण इतरांसाठी प्रकाशाचा झरा बनू शकतो. जरी आपले डोळे बंद झाले असले, तरी ते कोणाला तरी जग पाहण्यासाठी मदत करू शकतात. नेत्रदानाच्या माध्यमातून आपण एखाद्याच्या आयुष्यात नवजीवनाची नवी कथा लिहू शकतो. असा काही अर्थ या काव्याचा होतो. आज संपूर्ण जगामध्ये नेत्रदान दिन साजरा केला जातो. डोळ्यांमुळेच आपण आपल्या आयुष्याची सुंदरता पाहू शकतो, निसर्गाचे रंग बघू शकतो, आणि आपल्या कुटुंबीयांशी, मित्रांशी संवाद साधू शकतो. मात्र, अंधत्वामुळे अनेक लोकांचा जीवनाचा प्रवास अंधारमय होतो.
अंधत्व दूर करण्यासाठी आणि लोकांमध्ये दृष्टीदानाच्या महत्त्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी ‘दृष्टीदान दिन’ साजरा केला जातो. दृष्टीदान म्हणजे मृत्यू झाल्यावर डोळे दान करून दुसऱ्या अंध व्यक्तीस दृष्टी मिळवून देणे. डोळ्यांचे हे अंग शरीरातील इतर अवयवांप्रमाणेच पुन्हा वापरले जाऊ शकते आणि त्यामुळे अनेक लोकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करू शकतो. या उपक्रमाची सुरुवात भारतात १९८५ मध्ये झाली आणि तेव्हापासून नेत्रदानाचे काम आणि जनजागृती हळूहळू वाढत आहे.
या दिवशी डोळ्यांचे आरोग्य, अंधत्व प्रतिबंध, आणि नेत्र तपासणी यासंबंधी विविध कार्यक्रम राबवले जातात. दृष्टी ही मानव जीवनातील एक अतिशय मौल्यवान देणगी आहे. दृष्टीदान ही एक अशी सामाजिक जबाबदारी आहे जी प्रत्येक नागरिकाने स्विकारली पाहिजे. मृत्यूनंतर डोळे दान करून आपण अनेक अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण करू शकतो. या महान कार्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे आणि दृष्टीदान दिनाच्या माध्यमातून या उपक्रमाला प्रोत्साहन देऊन अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणे गरजेचं आहे.



