दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस भारतात ‘इंजिनिअर डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशातील महान अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन सन्मानपूर्वक स्मरणात ठेवला जातो. आधुनिक भारताला औद्योगिक आणि तांत्रिक क्षेत्रात नवे आयाम देणाऱ्या त्यांच्या कार्यामुळे त्यांना भारताच्या प्रगतीचा आधारस्तंभ मानले जाते. त्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे जलव्यवस्थापन, औद्योगिक विकास आणि शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडले.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचे योगदान
१८६१ मध्ये जन्मलेल्या विश्वेश्वरैयांनी अभियंता क्षेत्राला नवी दिशा दिली. त्यांनी कावेरी नदीवरील धरणे, सिंचन प्रकल्प, जलव्यवस्थापन प्रणाली यांसारख्या अनेक मोठ्या योजना यशस्वीपणे राबवल्या. त्यांचे “चेक डॅम”, स्वयं-नियंत्रित स्लुईस गेट्स, आणि आधुनिक सिंचन प्रणाली या त्यांच्या कल्पकतेचे उदाहरण आहेत. त्यांनी औद्योगिक शिक्षणावर भर देऊन पुढील पिढीला सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे प्रकल्प यशस्वी झाले आणि त्यामुळे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळाली.
देशातील दुसरे आणि राज्यातील स्वयंचलित दरवाजे असलेले पहिले धरण म्हणून राधानगरी धरण विशेष ओळख मिळवते. महान अभियंता डॉ. एम. विश्वेश्वरैया यांनी या धरणासाठी सात स्वयंचलित दरवाजांची रचना केली होती. सहा ते सात दशकांनंतरही हे धरण त्यांच्या दूरदृष्टी, तांत्रिक कौशल्य आणि नाविन्यपूर्ण विचारांची साक्ष देत उभे आहे. त्यांनी सिद्ध केले की अभियंते केवळ पूल, रस्ते किंवा धरणे बांधणारे तज्ज्ञ नाहीत, तर समाजाच्या दीर्घकालीन भविष्याचा पाया घडवणारे विचारवंत आणि मार्गदर्शक असतात. त्यांच्या कार्यातून विज्ञान, समाजहित आणि विकास यांचा समतोल साधणाऱ्या अभियंते समाजासाठी प्रेरणास्थान ठरतात.
आजचे अभियंते केवळ इमारती किंवा रस्ते बांधत नाहीत, तर संपूर्ण समाजाच्या गरजा आणि पर्यावरणीय आव्हानांचा विचार करून दीर्घकालीन उपाय शोधत आहेत. ऊर्जा, वाहतूक, आरोग्य, पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण, कृषी आणि स्मार्ट शहरांचे नियोजन यांसारख्या क्षेत्रांमध्ये अभियंत्यांचे योगदान सर्वत्र जाणवत आहे.
पुढील पिढीला प्रेरणा
इंजिनिअर डे केवळ एका दिवशी मर्यादित नाही; हा दिवस पुढील पिढीला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो. शाळा, महाविद्यालये आणि उद्योगक्षेत्रात विविध उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना अभियंता क्षेत्रातील संधी आणि जबाबदाऱ्या समजावून दिल्या जातात. युवा अभियंत्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे, नवकल्पना स्पर्धा आणि तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
इंजिनिअर समाज हा देशाच्या विकासाचा कणा आहे. त्यांचे काम संकटाच्या काळातही समाजाला मदतीचा हात देणारे असते. महामारी असो किंवा नैसर्गिक आपत्ती – अभियंत्यांचे कार्य हे मानवतेसाठी आणि प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरते. त्यांचा परिश्रम आणि जिद्द यामुळे देशाच्या पायाभूत सुविधा मजबूत होत आहेत आणि भविष्यासाठी नवे मार्ग खुले होत आहेत.