कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरातमधील ‘वनतारा’ या हत्ती पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले. मात्र, या निर्णयावर कोल्हापूर वासीयांचा तीव्र भावनिक आक्रोश व्यक्त झाला. माधुरी केवळ एक हत्तीण नसून, अनेकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. हे वास्तव वनताराने समजून घेतलं आणि आता एक ऐतिहासिक आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे.
देशातील पहिलं सॅटेलाईट हत्ती पुनर्वसन केंद्र
वनताराने, जैन मठ व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने कोल्हापूर जवळ नांदणी परिसरातच हत्तींसाठी अत्याधुनिक सॅटेलाईट पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे माधुरीला तिच्या मूळच्या परिसरातच राहता येणार असून, आरोग्याच्या दृष्टीने तिची काळजी वैज्ञानिक पद्धतीने घेतली जाणार आहे.
या केंद्रामध्ये माधुरीसाठी आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि नैसर्गिक वातावरण यांचा उत्तम समन्वय साधण्यात येणार आहे. वनताराचे अधिकारी म्हणाले, “ लोकांच्या भावना, मठाचं नेतृत्व आणि प्राणी कल्याण या तिन्ही बाबींचा आदर राखत आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही केवळ माधुरीचं आरोग्य सुधारण्यासाठी नव्हे, तर कोल्हापूर करांच्या भावना जपण्यासाठीही कटिबद्ध आहोत.”
हे असतील या सॅटेलाईट पुनर्वसन केंद्राचे वैशिष्ट्ये :
-
हायड्रोथेरपी तलाव आणि पोहण्यासाठी विशेष जागा – संधिवात व सांधेदुखी यावर उपयुक्त उपचार.
-
लेझर थेरपी साठी स्वतंत्र कक्ष – वेदना कमी करण्यासाठी अत्याधुनिक थेरपी सुविधा.
-
२४x७ पशुवैद्यकीय सेवा – प्रशिक्षित डॉक्टर, स्टाफ आणि तात्काळ आपत्कालीन सेवा.
-
मुक्त निवासस्थान – नैसर्गिक पण संरक्षित जागा जिथे माधुरी मोकळेपणाने वावरू शकते.
-
रबरयुक्त जमीन व मऊ वाळू टेकड्या (Soft Sand Mounds) – चालण्यासाठी सहजता व सांधेदुखीवरील आराम.
केवळ माधुरी साठी नव्हे, तर भविष्यासाठी एक पाऊल
वनताराने स्पष्ट केलं आहे की हे केंद्र केवळ माधुरी साठी नव्हे, तर भविष्यात आजारी किंवा वयोवृद्ध हत्तीं साठीही आदर्श ठरेल. प्राणी कल्याण आणि संवेदनशीलतेचा समतोल साधणारा हा उपक्रम भारतातील पहिला असेल.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी एक उच्चस्तरीय सल्लागार समिती नेमली जाणार आहे. केंद्रासाठी जागेचा अंतिम निर्णय महाराष्ट्र शासन, जैन मठ आणि वनतारा यांच्या संयुक्त बैठकीनंतर घेतला जाईल. एकदा जागा निश्चित झाली की, वनताराची तज्ज्ञ टीम काम सुरू करेल.
सहानुभूती, विज्ञान आणि श्रद्धेचा संगम
अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखालील वनतारा उपक्रम केवळ वन्यप्राण्यांच्या तात्कालिक आरोग्याच्या समस्यांवर उपाय शोधत नाही, तर भावनिक नातेसंबंध, आधुनिक विज्ञान आणि सहकार्य यांचा आदर्श नमुना उभा करत आहे.
कोल्हापूर सारख्या सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील भागात एक संवेदनशील तोडगा शोधत माधुरी च्या आरोग्यालाही प्राधान्य देत, लोकांच्या भावनांचाही आदर राखत हे पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय भारतातील प्राणी कल्याण क्षेत्राला एक नवा दिशादर्शक ठरू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
———————————————————————————————–



