दुबईहून मुंबईपर्यंत अवघ्या दोन तासांत? हे ऐकायला जितकं भन्नाट वाटतंय, तितकंच हे खरंही होऊ शकतं! कारण दुबई ते मुंबई अशी अरबी समुद्रातल्या पाण्याखालून जाणारी जलदगती रेल्वे सुरु होणार, अशा बातम्या सध्या जोरात व्हायरल झाल्यात. भारतातील मेडीयात ओसंडून वहायल्यात!. पण या प्रकल्पामागचा मुख्य व्यक्ती अब्दुल्ला अल शहही हे खलीज टाइम्स या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे बोललेकी, हा प्रकल्प सध्या केवळ ‘संकल्पना’ (conceptual stage) या टप्प्यावर आहे..

२०१८ मध्ये प्रथम मांडली होती कल्पना
या ‘हट के’ प्रकल्पाची कल्पना प्रथम २०१८ मध्ये मांडण्यात आली होती. त्यावेळीही काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी त्यावर बातम्या दिल्या होत्या. आता पुन्हा एकदा ही कल्पना फाॅर्मात आली असून भारतात यावर अनेक लेख, व्हिडीओ, बातम्या झळकल्यात. मात्र अल शहही यांनी स्पष्टच सांगितलय की, हा प्रकल्प अजूनही अभ्यासाच्या आणि व्यवहार्यता तपासणीच्या (feasibility study) टप्प्यात आहे.
1.5 अब्ज लोकांसाठी ट्रेनचा पर्याय
या प्रकल्पामागचा उद्देश म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, आणि गल्फ देश यांच्यातील व्यापार सुलभ करणं. ट्रेन सुरू झाल्यास विमानाच्या तुलनेत प्रवास स्वस्त आणि सोपा होईल, असं अल शहही यांचं म्हणणं आहे. हा मार्ग दुबई ते मुंबई इतकाच मर्यादित नसेल, तर तो कराची, मस्कत, इ. शहरांनाही जोडू शकतो.
पाण्याखालून बुलेट ट्रेन – कशी चालणार?
या प्रकल्पात मुंबई ते दुबई हे अंदाजे २००० किमीचे अंतर फक्त २ तासांत पार करता येणार असून, ट्रेन समुद्राच्या २०-३० मीटर खालून, काँक्रीटच्या टनेलमधून जाणार असून ते विशेष संरचनेद्वारे स्थिर ठेवले जातील. त्यातही मॅगलेव्ह टेक्नोलॉजी वापरून ट्रेन तब्बल १००० किमी प्रती तास वेगाने धावणार आहे! हे ऐकून बिनधास्त वाटतंय ना?
तेल आणि पाणी वाहतूक देखील शक्य
या मार्गामुळे फक्त प्रवासीच नव्हे, तर मालवाहतूकही सोपी होणार आहे. यूएईकडून भारतात तेल पाठवणं आणि भारतातून नर्मदा नदीचं पाणी यूएईला नेणं यासाठी ही लिंक उपयोगी पडणार आहे, असं शहही यांनी नमूद केलं. म्हणजेच हा प्रकल्प व्यापार, जलसंपत्ती आणि सामाजिक दृष्टिकोनातून फारच महत्वाचा ठरू शकतो.

यूएई – भारताचे गल्फच्या दिशेने प्रवेशद्वार
अल शहही यांनी सांगितलं की, “या प्रकल्पामुळे यूएई हे भारतासाठी अरब समुद्राच्या बाजूने मुख्य प्रवेशद्वार बनेल.” यातून दोन्ही देशांचा आर्थिक व व्यापारी विकास होईल.
या प्रकल्पामागची कंपनी The National Advisor Bureau Limited ही सल्लागार कंपनी असून, याआधीही त्यांनी अशा काही अफलातून संकल्पना मांडल्या आहेत.
ही केवळ ट्रेन नाही, तर १.५ अब्ज लोकांचं भविष्य बदलणारी योजना आहे; स्वप्न मोठं आहे, पण वाट दूर आहे!
दुबई ते मुंबई असा जलदगती ट्रेनचा मार्ग ही कल्पना निश्चितच अद्वितीय आणि क्रांतिकारी आहे. मात्र आत्ता ती फक्त कागदावर आहे. तांत्रिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि राजनैतिक अनेक अडचणी पार केल्याशिवाय हा प्रकल्प प्रत्यक्षात येणं अवघडच आहे. तरीसुद्धा अशा संकल्पना भविष्यातील तंत्रज्ञानाची आणि जागतिक सहकार्याची दिशा दाखवतात, हेही तितकंच खरं.
तर कोल्हापुरी मंडळी, अजून तरी विमानानेच जा, पण उद्या कधी ट्रेननं दुबईला पोचायला फक्त दोन तास लागले, तर आश्चर्य वाटू देऊ नका हां!
–शितल कदम