प्रसारमाध्यम डेस्क :
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!
कविवर्य कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ या कवितेतील ओळी सार्थ ठरवत पुन्हा नव्याने लढण्यास उभारलेल्या ७५ वर्षीय दीपक सखाराम कुलकर्णी म्हणजेच DSK हे पुण्यातील नामवंत बांधकाम व्यावसायिक आहेत. डी.एस. कुलकर्णी हे डी.एस.के बिल्डर्स म्हणून ओळखले जात.
घराला ‘घरपण’ देणारा माणूस म्हणून ज्यांची ओळख होती, ते DSK कुलकर्णी साहेब म्हणजे आत्मविश्वास, जिद्द आणि सकारात्मकतेचा जिवंत नमुना आहेत. आत्मविश्वास म्हणजे काय आणि तो किती महत्त्वाचा असतो, हे त्यांच्या आयुष्याकडे पाहून शिकायला मिळतं.
एक काळ असा होता की हजारो कुटुंबांच्या स्वप्नांना आकार देणारा हा माणूस सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा मालक होता. मात्र केवळ सुमारे ३२०० कोटी रुपयांच्या देणी परत करण्याच्या प्रक्रियेमुळे नियतीने—किंवा काळाने—त्यांच्यावर मोठा आघात केला. परिस्थिती इतकी कठीण होती की अनेक जण खचून गेले असते; पण हा माणूस मात्र खचला नाही.
“मला कोणाचाही एक रुपया बुडवायचा नाही,” या ठाम विश्वासावर त्यांनी पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला. आत्मविश्वास, संयम आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन ते पुन्हा एकदा व्यवसायाच्या रंगणात उतरले आहेत. हजारो कोटींचे नवे प्रकल्प उभे करण्यासाठी ते आजही तितक्याच जिद्दीने काम करत आहेत, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवतं.
त्यांच्या शब्दांत एक ठाम विश्वास आहे—“माझी अडचण आज आहे, उद्या असेल; पण परवा नक्कीच नसेल.” कारण शेवटी माणसाच्या आयुष्यात कर्म आणि नीतिमत्ताच खरी फळं देतात, हा त्यांचा दृढ विश्वास आहे. त्यांच्या मते, गेली ४० वर्षे त्यांनी गुंतवणूकदारांना नफा दिला; त्या काळात कोणी प्रश्न विचारला नाही. मात्र एकाच वेळी सर्व गुंतवणूकदारांनी पैसे परत मागितले, तर ते तात्काळ देणं कोणालाही शक्य नसतं—ही वस्तुस्थिती आहे.
ते स्पष्टपणे सांगतात की काही लोकांनी जाणीवपूर्वक अडचणी वाढवल्या; मात्र त्यांच्याबद्दलही ते कटुता बाळगत नाहीत. “मी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे, आणि ते सहज संपणार नाही,” हा त्यांचा आत्मविश्वास प्रेरणादायी आहे.
त्यांच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे. युट्यूबवर मुलाखती पाहिल्या होत्या; पण काल प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव अतिशय समाधान देणारा ठरला. उमेद न हरता, पुन्हा लढण्याची तयारी ठेवणारा हा मराठी माणूस पाहून अभिमान वाटतो—कारण अशा जिद्दी माणसांमुळेच आशा जिवंत राहते.अश्या या मराठी उद्योजकाला पुन्हा ताठ कण्याने उभारण्यासाठी मराठी लोकांनी विश्वास ठेवणे गरजेचे आहे…
महत्वाचे घेण्यासारखे आजच्या Gen Z म्हणजे जनरेशन झेड वाल्यांना छोट्या छोट्या कारणावरून आत्महत्या करणाऱ्या MPSC UPSC त अपयश मिळाल्यावर निराश होणारे त्यांना वाटते कि या परीक्षा पास होणे म्हणजे जीवन आहे. एखादी नोकरी गमावली म्हणजे सगळ संपल अशी समजूत असणार्यांनी DSK न सारख्या व्यक्तींच्या जीवन प्रवासावरून शिकणे गरजेचे आहे. कारण सगळ संपल तरी आपण स्वत: अजून बाकी असतो. जोपर्यंत आपण स्वत: आहे: तो पर्यंत पिक्चर अभी बाकी है,मेरे दोस्त….l






