मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक संच खरेदी वरील अनुदान वेळेत मिळावे यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वितरक नोंदणीची अट यापुढे तूर्त स्थगित करण्यात आली असून फलोत्पादन संचालनालयाने सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना ( एसएओ ) स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, वितरक नोंदणी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना रोखू नये.
वितरक नोंदणीचा गोंधळ
‘प्रति थेंब अधिक पीक योजना’ अंतर्गत दरवर्षी वितरकांना फेरनोंदणी करावी लागते. मात्र २०२५-२६ साठी नोंदणी प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या अर्जांना मंजुरी मिळण्यात अडथळे निर्माण झाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, २०२४-२५ साली नोंदणी झालेल्या सूक्ष्म सिंचन कंपन्यांच्या वितरकांची यादीच यंदासाठी मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
लाखो अर्ज ठप्प
मागील वर्षी ठिबक अनुदानासाठी पाच लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यातील पहिले २ लाख २६ हजार अर्ज ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर पात्र ठरले. मात्र संच बसविण्याची आणि तपासणीची प्रक्रिया वितरक नोंदणी अभावी थांबली होती. परिणामी, निधी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळत नव्हते.
केंद्राचा निधी धोक्यात
कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले की, अनुदान वितरण वेळेत न झाल्यास केंद्राकडून पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या वार्षिक कृती आराखड्यातील ठिबक अनुदानाचा दुसरा हप्ता लवकरच राज्याला मिळणार असल्याने वितरक नोंदणीतील घोळ थांबवणे गरजेचे होते.
एसएओंना स्पष्ट आदेश
फलोत्पादन संचालनालयाने एसएओंना निर्देश दिले आहेत की, वितरक नोंदणीच्या कारणावरून कोणताही प्रस्ताव अडवू नये. तसेच ठिबक कंपन्यांनी वितरकांची नोंदणी प्रमाणपत्रे वेळेत सादर करावीत, यासाठीही कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना वेळेत अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठिबक संच बसविण्यात होणारा विलंब टळून पाणी बचत, खर्चात बचत आणि उत्पादन क्षमतेत वाढ साधता येणार आहे. ठिबक सिंचनाचा प्रसार अधिक वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
————————————————————————————————–