प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत दुहेरी लाभ

मातांचे आरोग्य आणि मुलींच्या जन्माबाबत सकारात्मकता वाढविण्यासाठी शासनाचा उपक्रम

0
164
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचे पोषण व आरोग्य जपून सुदृढ पुढील पिढी घडविणे तसेच मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मकता निर्माण करणे या दुहेरी उद्देशाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राज्यभर महिला व बालविकास विभागामार्फत राबवली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी एकात्मिक बाल विकास प्रकल्पांमार्फत केली जात असून, केंद्र सरकारने  २०२५-२६  या वर्षासाठी देशभरात ५ लाख ७० हजार महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे.
योजनेत मिळणारे लाभ
  • पहिल्या अपत्यासाठी एकूण ₹ ५,०००  चा लाभ
  • गर्भधारणेची नोंदणी व प्रसूतीपूर्व तपासणी पूर्ण झाल्यावर ₹३,०००
  • बाळ जन्मानंतर आणि १४ आठवड्यांपर्यंत सर्व आवश्यक लसीकरण झाल्यावर ₹२,०००
  • दुसऱ्या अपत्यासाठी विशेष प्रोत्साहन : मुलगी जन्मल्यास एकाच हप्त्यात ₹ ६,०००
पात्रता निकष
  • वार्षिक उत्पन्न ₹ ८ लाखांपेक्षा कमी असलेली कुटुंबे
  • अनुसूचित जाती-जमातीतील महिला
  • ४० % किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या महिला
  • बीपीएल शिधापत्रिका, ई-श्रम कार्ड, किसान सन्मान निधी, मनरेगा जॉब कार्ड धारक कुटुंबे
  • प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी, अन्नसुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत रेशनिंग कार्डधारक
  • अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा आशा कार्यकर्ती महिला
अर्ज प्रक्रिया –  लाभ घेण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात संपर्क साधून अर्ज करता येतो. आवश्यक कागदपत्रांची माहितीही याच केंद्रांवरून मिळते.
योजनेची प्रगती – राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांचे जिल्हा नोडल अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच क्षेत्रीय स्तरावरील मुख्य सेविकांचे मॅपिंग १०० टक्के पूर्ण झाले आहे. या वर्षी आतापर्यंत ४० हजार महिलांची नोंदणी झाली असून उर्वरित उद्दिष्ट लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत पात्र पण प्रलंबित असलेल्या लाभार्थिनींना हक्काचा लाभ वेळेवर देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
२०१७ पासून योजनेचा लाभ न घेतलेल्या महिलांपर्यंत अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या माध्यमातून योजना पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असून, मातांचे आरोग्य, कुटुंबाचा आनंद आणि समाजाचा विकास साधण्यासाठी ही योजना प्रभावी ठरत आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही मातांसाठी सुरक्षा कवच ठरत असून, सुदृढ व आनंदी समाज उभारण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

———————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here