कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
दिव्यांगांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून कालमर्यादा ठेवून त्यांच्यासाठी विकासाचे कार्यक्रम राबवावेत. रेशन कार्ड, युडीआयडी, घरकुल योजना, अंत्योदय योजना आणि पेन्शन यांसारख्या लाभांची अंमलबजावणी प्राधान्याने करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मागण्यांसंदर्भातील आढावा बैठक पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महापालिका उपायुक्त पंडित पाटील, सहायक आयुक्त समाजकल्याण सचिन साळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी संभाजी पोवार, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे, तसेच प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष देवदत्त माने, उपाध्यक्ष विकास चौगुले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शासनाच्या नियमांनुसार ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिकांमध्ये दिव्यांगांच्या विकासासाठी निधी आरक्षित करण्यात येतो. हा निधी पूर्णपणे खर्च करून दिव्यांगांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेशासाठी रॅम्पची सुविधा तातडीने उपलब्ध करावी. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बेघर दिव्यांगांच्या अर्जांची भरती करण्यात यावी.
एस.टी. बसमधून प्रवास करताना प्रवाशांनी दिव्यांगांना प्राधान्याने जागा द्यावी. एस.टी. महामंडळाने दिव्यांगांसाठी आरक्षित जागांबाबत जनजागृती करावी. संजय गांधी निराधार पेन्शन योजनेची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत.
सी.पी.आर. रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासह इतर सुविधा तळमजल्यावर उपलब्ध होतील, याची व्यवस्था करावी. कोल्हापूर महानगरपालिकेने प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना पॉवरलिफ्टिंग बेंच व साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच पॅरा जिल्हास्तरीय स्पर्धांसाठीही निधी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. या वेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष देवदत्त माने यांनी दिव्यांगांच्या विविध मागण्या बैठकीत मांडल्या. बैठकीआधी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांनी केला. नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूरला राज्यात १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात दुसरा क्रमांक मिळाला होता.
———————————————————————————————



