कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
दरवर्षी खाद्य तेल मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. यासाठी सरकारचा बराचसा पैसा खर्ची पडतो. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षीपासून राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सुरु केले आहे. या अभियानातर्गत सन २०२५-२६ या वर्षात शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित सोयाबीन व भुईमूग बियाण्यांचे वितरण करण्यात येत आहे. हे वितरण महाडीबीटी पोर्टलद्वारे “प्रथम अर्ज, प्रथम सेवा” तत्वावर पार पाडण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर गुणवत्ता असलेले बियाणे देण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत सोयाबीनसाठी एकूण ४६ हजार ५०० क्विंटल आणि भुईमूगसाठी १६ हजार क्विंटल बियाण्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. सद्य:स्थितीत महाडीबीटी पोर्टलद्वारे सोयाबीनसाठी ४४ हजार,३१७.१३ क्विंटल (९५.३१टक्के ) आणि भुईमूगसाठी ६ हजार, ८५७.५४ क्विंटल (४२.८६टक्के ) बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना ‘एसएमएस’द्वारे सूचना देण्यात येत असून, त्यानुसार संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पाच दिवसांच्या आत बियाण्याचा लाभ घ्यावा लागतो. अन्यथा लाभाची नोंद रद्द केली जाते. बियाणे एकदाच उचलणे आवश्यक असून, पुन्हा मागणी केल्यास बियाण्याची किंमत लागू असणार आहे.
संबंधित बियाणे वितरक संस्थांकडून महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, कृभको, एच आयएल इ. – बियाण्यांचा पुरवठा तालुकास्तरावर करण्यात येत आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवरुन लाभाची पुष्टी मिळाल्यानंतर संबंधित वितरण केंद्रातून बियाणे उचलावे लागते आहे.
या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे वेळेत उपलब्ध व्हावे, यावर कृषी विभाग भर देत आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून पुढील टप्पे तातडीने पूर्ण करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
——————————————————————————