नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. जुलै ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या महागाई भत्ता ५५ टक्के इतका आहे आणि ही वाढ लागू झाल्यास तो ५८ टक्क्यांवर पोहोचेल.
डीए अर्थात महागाई भत्ता मूळ पगारावर निर्धारित केला जातो. ज्यामुळं त्याचं एकूण प्रमाण व्यक्तीनुरूप वेगळं असू शकतं. पेन्शनधारकांचं मूळ वेतन ९००० रुपये आहे, तर ५५ टक्के महागाई भत्त्याच्या हिशोबानं त्यांना या भत्त्यासाठी ४९५० रुपये मिळतात. म्हणजेच एकूण पेन्शन १३९५० रुपयांवर जाते. येत्या काळात जर डीए ५८ टक्क्यांवर पोहोचला तर, याच कर्मचाऱ्यांना ५२२० रुपये मिळणार असून, एकूण पेन्शनची रक्कम १४२२० वर पोहोचणार आहे.
राहिला प्रश्न पगाराचा तर, कोणा कर्मचाऱ्याचा मूळ पगार १८००० रुपये असल्यास ५५ टक्के महागाई भत्त्यासह त्यांना ९९०० रुपये मिळतील आणि एकूण पगार २७९०० रुपयांवर पोहोचेल. मात्र आता डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ होऊन तो ५८ टक्क्यांवर पोहोचल्यास हातात येणारा एकूण पगार असेल २८४४० रुपये.
दर सहा महिन्यांनी डीए मध्ये सुधारणा केली जाते, आणि त्याचा हिशेब मुख्यतः ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित असतो. नुकत्याच जाहीर झालेल्या आकड्यांनुसार, महागाई दरामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्यामुळे डीए वाढीची ही शक्यता वर्तवली जात आहे.
सामान्यपणे सरकार सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात अधिकृत घोषणा करते, आणि ती वाढ जुलैपासून लागू केली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना थकबाकीसह वाढीव महागाई भत्ता मिळण्याची शक्यता आहे.
———————————————————————————