अनिल जासुद : कुरुंदवाड
अंगारकी संकष्टी निमित्त मंगळवारी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी गणेशवाडीतील गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. तब्बल २१ वर्षानतंर श्रावणमासात अंगारकी संकष्टीचा योग आला आहे. यामुळे पहाटेपासूनच “श्री” च्या दर्शनासाठी भाविक येत होते.
शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे पुरातन संस्थानकालीन असे श्री गणपती देवस्थान आहे. येथील लिखीत माहीतीनुसार या मंदिराची स्थापना इ. स.१७५६ मध्ये कुरुंदवाडचे हरभट जीवबा पटवर्धन सरकार यांनी केली आहे. हे हेमाडपंती बाधकाम शैलीतील पुरातन असे स्वंयभू गणेश मंदिर आहे. कर्नाटकातील कुरुंद दगडापासून मंदिराची संपूर्ण बांधणी झालेली आहे.
गणेशवाडी पंचक्रोशीत हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. नवसाला पावणारा गणपती म्हणून याची प्रचिती आहे. एक अंगारकी संकष्टी केल्यास वर्षातील बारा संकष्टीचे फळ मिळते अशी श्रध्दा आहे. तसेच जे संकष्टी सुरु करणार असतात ते अंगारकी संकष्टीपासून सुरु करतात. यामुळे या संकष्टीस एक अध्यात्मिक महत्व आहे. गणेशवाडी येथे प्रत्येक संकष्टीला “श्री “चे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी असते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातील गणेश भक्त येथे “श्री” चे दर्शन घेण्यासाठी येतात. तर काही भाविक चक्क पायी चालत येतात.
अंगारकी सकष्टी निमित्त मंगळवारी सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत नित्यपूजा व अभिषेक विधी झाला. दुपारी साडेबारा वाजता महापूजा झाली. यावेळी मंदिरातील पुजारी अमोख काणे व गजानन काणे यांनी ” श्रीं ” च्या मूर्ती भोवती सुरेख अशी पानपूजा बांधली होती. सायंकाळी साडेसात वाजता आरती व मंत्रपुष्पांजली म्हणण्यात आली. आरती नंतर गणेशवाडी माळभागावरील अचानक मित्र मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.