कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, एकूण १९ जिल्ह्यांतील सुमारे २० लाख १२ हजार ७७५ एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यांसह इतर पिकांचा समावेश आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम मध्ये पत्रकार परिषदेत दिली.
कृषिमंत्र्यांनी सांगितले की, राज्य शासनाने या नुकसानाचा त्वरित आढावा घेतला असून, शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून नुकसानभरपाईचे वितरण करण्यात येईल. शेतकऱ्यांवर आलेले संकट लक्षात घेता शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. केंद्र सरकारकडेही मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून, शेतकऱ्यांना मदतीसाठी कुठलीही कसूर ठेवली जाणार नाही.
अतिवृष्टीमुळे राज्यातील १९ जिल्ह्यात २०लाख १२ हजार ७७५ एक्कर क्षेत्रावरील सोयाबीन, मका,कापूस, उडीद, तूर, मूग यासह अन्य पिकांचं नुकसान झाले आहे. राज्यात सर्वाधिक ७ लाख १३ हजार ८५७ एक्कर क्षेत्राचे नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून त्यापाठोपाठ वाशिम जिल्ह्यात ४ लाख ११ हजार ३९२ एकर क्षेत्रावर पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास सर्वाधिक नुकसान वाशिम जिल्ह्यात असल्याचही भरणे यांनी सांगितले, या नुकसानीचे पंचनामे सुरू असून अहवाल मिळाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं भरणे यांनी सांगितले.
राज्यातील ऑगस्ट २०२५ मधील अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील तब्बल १९ जिल्ह्यांमधील १८७ तालुके आणि ६५४ महसूल मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, ८०५,११० हेक्टर म्हणजे तब्बल २०,१२,७७५ एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये १०,००० हेक्टरपेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्र असलेले ११ जिल्हे समोर आले आहेत.सर्वाधिक नुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये नांदेड (२,८५,५४३ हे.), वाशिम (१,६४,५५७ हे.), यवतमाळ (८०,९६९ हे.), बुलढाणा (७४,४०५ हे.), अकोला (४३,७०३ हे.), सोलापूर (४१,४७२ हे.) आणि हिंगोली (४०,००० हे.) या जिल्ह्याचा समावेश आहे.
—————————————————————————————






