मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने मधील संभाव्य युतीची चर्चा आता केवळ अटकळ राहिलेली नाही, तर राजकीय वास्तवात उतरत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या भेटी, एकत्रित कार्यक्रम, आणि सकारात्मक विधाने यामुळे ही युती लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान करत म्हटलं की, “राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास, आम्ही मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक अशा महत्त्वाच्या महापालिकांमध्ये बहुमत मिळवू.” राऊत यांच्या या विधानाने एकप्रकारे दोन्ही पक्षांची युती जवळपास निश्चित असल्याचे संकेत दिले आहेत.
राज ठाकरे : २० वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो.
मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी चक्क उद्धव ठाकरेंचा थेट उल्लेख केला. ते म्हणाले, “ २० वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता ? ” यामागील राजकीय संदेश स्पष्ट होता. ज्या विषयावर राज ठाकरे यापूर्वी मौन बाळगून होते, त्यावर आता त्यांनी सूचक बोलायला सुरुवात केली आहे.
हिंदी दिनी मंचावर एकत्र, वाढदिवसाला मातोश्रीवर भेट
अलीकडे हिंदी दिनाच्या निमित्ताने दोघे भाऊ एकाच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या दोन्ही प्रसंगांनी त्यांच्या संबंधांमधील बर्फ वितळू लागल्याचे स्पष्ट झाले.
उद्धव ठाकरे यांनीही युतीबाबत वारंवार सकारात्मक भूमिका घेतली आहे. पण राज ठाकरे यांचा याबाबतचा ‘शब्द’ मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे युती होणारच, की नुसती चर्चा राहणार याबाबत उत्सुकता अधिकच वाढली आहे.
उद्धव ठाकरे यांचा पक्ष तयारीच्या Mood मध्ये
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी नुकतीच एमएमआर क्षेत्रातील महापालिका निवडणुकांबाबत आढावा बैठक घेतली. ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, वसई-विरारसह ७ महापालिकांमधील तयारीचा धडाका सुरू करण्याचे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. “ मनसे सोबत युती होणार की नाही, हे पक्ष ठरवेल; पण तुम्ही सर्वच जागांसाठी तयारी करा ”, असं स्पष्ट आदेश त्यांनी बैठकीत दिला.
महापालिका निवडणुका डिसेंबर-जानेवारीत होण्याची शक्यता असून, त्याआधी ठाकरे बंधूंनी जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तर मुंबईसह इतर शहरांतील सत्तासमीकरणं मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. सध्या भाजप-शिंदे युती सरकार असताना, जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले, तर मराठी मतांचे मोठे ध्रुवीकरण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. राजकीय घडामोडी, मेळावे, वक्तव्यं आणि भेटीगाठी पाहता राज-उद्धव युती जवळ आली आहे, हे स्पष्ट आहे. पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंतचा एकमेव प्रश्न ही युती अधिकृतपणे केव्हा जाहीर होणार?
——————————————————————————-