पन्हाळा : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचे पन्हाळा तहसील कार्यालयाच्यावतीने आणि वाडीरत्नागिरी मंडळ कार्यालयांतर्गत राज्य शासनाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान जोतिबा डोंगर येथे आयोजित करण्यात आले होते. नायब तहसिलदार विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानांतर्गत नागरिकांना शासनाचे विविध दाखले एकाच छताखाली वितरीत करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान म्हणजेच हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने सुरू केलेले एक विशेष अभियान आहे, ज्यामध्ये नागरिकांच्या विविध महसूल विषयक अडचणी, तक्रारी आणि सेवा गावपातळीवर तत्काळ, पारदर्शक आणि प्रभावीपणे सोडवण्याचा उद्देश आहे. आज याच अभियानांतर्गत जोतिबा डोंगर येथे नागरिकांना विविध दाखले एकाच छताखाली वितरीत करण्यात आले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी वाडीरत्नागिरी मंडळ अधिकारी वासंती पाटील यांनी विशेष प्रयत्न केले तर वैभव मोरे, विशाल पाटील,अभिजित सावंत आणि संजय सुतार या महा ई सेवा केंद्र चालकांनी त्यांना सहकार्य केले.
जोतिबा डोंगर येथे पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानावेळी संजय गांधी विभागाच्या नायब तहसिलदार रोहिणी गायगोपाळ, तलाठी मोनाली चव्हाण, पी.बी.निगडे, निखील पाटील, कोतवाल सागर छत्रे, कीर्ती कांबळे, कमल पाटील, महादेव साळवी, मारुती सातर्डेकर, पोलीस पाटील बाळासाहेब कदम, अकिब अगा, लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या अभियानात दिलेल्या सेवा :
सातबारा (७/१२) उताऱ्यात दुरुस्ती
वारस नोंदणी (वारसाचा दाखला)
नाव फेरफार (नवीन मालकाची नोंद)
जमीन मोजणी संदर्भातील तक्रारी
भोगवटेदार नोंदणी व तुकडे पाडणी
जमीन खरेदी-विक्री नोंदणी प्रक्रिया
शेतीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला इ. प्रमाणपत्रे
संपत्ति पत्रिका, जमीन मालकीबाबतची स्पष्टता