मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे आता अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार काही तासांत पूर्ण होऊ लागले आहेत. याचा थेट परिणाम आरोग्य विमा धोरणांवरही झाला आहे. विमा कंपन्यांनी आपल्या नियमांमध्ये लक्षणीय बदल करून कमी वेळेत होणाऱ्या उपचारांनाही विम्याचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे.
Policybazaar.com च्या आरोग्य विमा विभागाचे प्रमुख सिद्धार्थ सिंघल यांनी सांगितले, “पूर्वी लहान कालावधीचे उपचार विम्याच्या नियमांखाली येत नव्हते. त्यामुळे अनेक रुग्णांना विमा असूनही खर्च स्वतःकडून करावा लागत असे. मात्र आता अनेक बड्या विमा कंपन्यांनी हे नियम शिथील केले असून, कमी वेळेत होणाऱ्या उपचारांनाही विम्याचा लाभ मिळणार आहे.”
आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे लॅपरोस्कोपी, लेसर शस्त्रक्रिया, मोतीबिंदू ऑपरेशन, केमोथेरपी, अँजिओग्राफीसारखे उपचार काही तासांतच पूर्ण होतात. या उपचारांमुळे रुग्णांना रुग्णालयात दीर्घकाळ राहण्याची गरज राहत नाही आणि वेगाने बरे होण्याची शक्यता वाढते. याच गोष्टीचा विचार करून विमा कंपन्यांनी अधिक लवचिक धोरणं स्वीकारली आहेत.
या बदलांचा थेट फायदा सामान्य नागरिकांना होत आहे. पूर्वी लहान उपचारांसाठी विमा मिळत नसल्यामुळे अनेकांनी आर्थिक ताण झेलला होता. मात्र आता बदललेल्या नियमांमुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे आणि वैद्यकीय खर्चातून मुक्ती मिळत आहे.
लहानशा उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची अट शिथील झाली असून, अवघ्या दोन तासांत झालेल्या उपचारांवरही विम्याचा लाभ मिळणार आहे. विमा धारकांनी आपल्या पॉलिसीचे नियम नव्याने समजून घेणे गरजेचे आहे.
—————————————————————————————



