चंदगड : प्रतिनिधी
चंदगड तालुका हा जिल्ह्यात विस्ताराने मोठा आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम असलेला भाग आहे. तालुक्याच्या आरोग्यसेवेचा दर्जा उंचावावा आणि आरोग्यसेवा सहजपणे सर्वसामान्य जनतेला उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार शिवाजी पाटील यांनी आरोग्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे विशेष मागणी केली.
तालुक्यातील बरीच गावं अजूनहीजंगल वाटांनी जोडली आहेत. काही गावांमध्ये रुग्णांना उपचारासाठी तब्बल २५-३० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. यामध्ये वेळेअभावी आणि उपचाराच्या अभावामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या गंभीर गोष्टींची दखल घेऊन आमदार शिवाजीराव पाटील यांनी चंदगड ग्रामीण रुग्णालयात आयसीयू सुविधा, रक्तपेढी, एक्स-रे आणि सोनोग्राफीसारखी अत्याधुनिक यंत्रणा द्यावी. दुर्गम भागात २४ तास सेवा देणाऱ्या मोचाईल आरोग्य युनिटस् कार्यरत करा, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची नेमणूक करावी आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करावी, अशी मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली.
या मागण्यांबाबत मंत्री आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावर कृती आराखडा तयार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी भरमू पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.