कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापुरात काल मध्यम स्वरूपाचा असलेला पाऊस आज वाढला आहे. आज पहाटे दीप अमावस्या सुरु झाली. अमावस्येचा परिणाम पाऊस कमी होण्यासाठी होतो किंवा पाऊस वाढण्यावर होतो. गत चार दिवसापर्यंत विश्रांती घेतलेला पाऊस सुरु झाल्याने पाऊस वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. हवामान विभागाने कोकणात प्रामुख्यानं किनारपट्टी भाग, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी असेल. तर, सातारा, कोल्हापूर, नाशिकमध्येही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. प्रामुख्यानं घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून, दृश्यमानता कमी राहील. शिवाय या भागांमध्ये दृश्यमानता कमी राहणार असल्या कारणानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केली आहे.
देशाच्या उत्तरेकडे पावसानं मुक्काम वाढवलेला असतानाच इथं महाराष्ट्रातसुद्धा पावसाची जोरदार हजेरी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात पर्जन्यमानासाठी पूरक वातावरणीय स्थिती असून, या धर्तीवर प्रामुख्यानं घाटमाथ्याचं क्षेत्र आणि कोकण परिसर प्रभावित होताना दिसेल. ज्यामुळं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या धर्तीवर या भागांसाठी हवामान विभागानं अतिदक्षतेचा अर्थात रेड अलर्ट जारी केला आहे.
कोकणातच उत्तरेकडील भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल तर, विदर्भातसुद्धा असंच पर्जन्यमान पाहायला मिळेल. ज्यामुळं या भागांना अनुक्रमे ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून हजेरी लावणार असून, पाऊस काही विश्रांती घेणार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं या भागांमध्ये इतक्यात उघडीप पाहायला मिळणार नाही.
मुंबईसाठी ४ दिवस धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला असून, २४ जुलैपासून चार दिवस समुद्रात मोठी भरती येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. समुद्रात २६ जुलैला ४.६७ मीटर उंच लाटा उसळणार असल्यानं नागरिकांना आणि मासेमारांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विफा चक्रीवादळाची शक्यता
बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत असून, विफा चक्रीवादळाचे संकेत मिळत आहेत. त्यातच भर म्हणजे आरबी समुद्राच्या ईशान्येपासून गुजरातच्या दक्षिणेपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रापासून थेट आंध्र प्रदेशापर्यंत वाऱ्यांची चक्राकार स्थिती आणि कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्या कारणानं पावसाची जोरदार हजेरी राज्यात पाहायला मिळेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
——————————————————————————————–