कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्र सरकारने वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य कॅबिनेट बैठकीत ॲप व वेब आधारित नोंदणीकृत प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खासगी कार पूलिंगला कायदेशीर मान्यता दिली आहे. आता तुम्ही अधिकृत ॲप वापरून कार पूलिंग करू शकता आणि इतर प्रवाशांनाही तुमच्या कारमध्ये घेऊन जाऊ शकता तेही कायद्याच्या मर्यादेत.
कार पूलिंग म्हणजे काय?
कार पूलिंग म्हणजे एकाच दिशेने जाणाऱ्या दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकाच खासगी वाहनाने एकत्र प्रवास करणे. म्हणजेच, एखाद्या ऑफिसला जाणारे चार जण जर वेगवेगळ्या कारने जाण्याऐवजी एकाच कारने एकत्र गेले, तर त्याला कार पूलिंग म्हणतात. यामुळे वाहनांची संख्या होणार आहे, त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल. इंधनाची बचत होणार कारण एकच वाहन वापरले जाणार आहे. पर्यावरणावर सकारात्मक परिणाम, कारण कमी वाहनांमुळे प्रदूषणही कमी होईल. प्रवासाचा खर्च वाटून घेतला गेल्याने सर्व प्रवाशांचा खर्च कमी होणार
कार पूलिंग सेवा कायदेशीर ; वाहनधारकांना दिलासा
राज्य शासनाच्या निर्णयामुळे आता नोंदणीकृत ॲपच्या माध्यमातून खासगी वाहने अधिकृतपणे कार पूलिंग करू शकतील. केंद्र सरकारच्या एग्रीगेटर नीति २०२० अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंतिम मंजुरी केंद्र सरकारकडून अपेक्षित आहे. सरकारच्या मते, कार पूलिंगमुळे वाहनांची संख्या कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल. विशेषतः मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक यांसारख्या अत्यंत गर्दीच्या मार्गांवर हा निर्णय प्रभावी ठरू शकतो.
दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे, कारण यामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाने यासाठी सविस्तर नियम व अटी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
कार पूलिंग सेवेची अंमलबजावणी करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सेवा पारदर्शक आणि नियंत्रित राहील, यासाठी शासन सुसूत्र नियमावली तयार करणार आहे. सेवा पुरवठादारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखरेख यंत्रणा तयार केली जाणार आहे.
————————————————————————————————-