मुंबई : प्रसारमाध्य़म वृत्तसेवा
राज्यातील शेतकरी आणि ग्राहक यांना थेट जोडणारी खरेदी-विक्रीची प्रभावी साखळी निर्माण करण्यासाठी ‘अपना भांडार’ या नावाने बहुउद्देशीय ग्राहक भांडारांची जाळी सर्व जिल्ह्यांत उभारण्याचा संकल्प सरकारने केला आहे. यामुळे उत्पादकांना थेट विक्रीची संधी आणि ग्राहकांना योग्य दरात दर्जेदार वस्तू उपलब्ध होणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मंत्री रावल यांनी मुंबईतील महासंघाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी महासंघाच्या प्राधिकृत समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, कार्यकारी संचालक विकास रसाळ, संचालक जयसिंग गिरासे, संचालक गोकुळ परदेशी यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
मंत्री रावल म्हणाले, “ महासंघाच्या मालकीच्या जागांचा पुनर्विकास करून त्या सुस्थितीत आणणे गरजेचे आहे. तसेच ज्या जागा भाडेतत्त्वावर आहेत त्यांची मालकी मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समित्या, बचत गटांसाठी उभारले जाणारे मॉल्स आदी ठिकाणी ‘ अपना भांडार ’ सुरू करावेत. येथे महिला बचत गटांच्या उत्पादनांनाही स्थान द्यावे. राज्यभरात ग्राहक महासंघाच्या माध्यमातून एक सशक्त ब्रँड निर्माण करण्याची आवश्यकता आहे.”
ते पुढे म्हणाले, “ राज्यातील ग्राहक भांडारांना ऊर्जितावस्था मिळावी आणि जे उत्कृष्ट कार्य करत आहेत, त्यांचे काम इतरांना प्रेरणादायी ठरावे, यासाठी सप्टेंबर महिन्यात नाशिक येथे सर्व ग्राहक भांडारांचा मेळावा आयोजित करण्यात यावा. यात इतर राज्यांतील यशस्वी संस्था, ई-कॉमर्स तज्ञ आणि आधुनिक तंत्रज्ञान जाणकार यांचे सहकार्य घ्यावे.”
प्रारंभी कार्यकारी संचालक विकास रसाळ यांनी महासंघाच्या कार्याची सविस्तर माहिती सादर केली. सरकारच्या या उपक्रमामुळे सहकार क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल आणि शेतकरी–ग्राहक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
———————————————————————————————–



