प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
सनी देओलच्या बहुप्रतिक्षित ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार एंट्री घेतली असून, 2025 मधील सर्वात मोठा हिट ठरलेल्या ‘धुरंधर’ चा पहिल्या दिवसाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. देशभक्ती, भावना आणि युद्धपटाचा दमदार अनुभव देणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
2026 मधील पहिली मोठी रिलीज ठरलेली ‘बॉर्डर 2’ शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाली. रिलीजआधीपासूनच या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. चित्रपटाला बहुतांश ठिकाणी पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळत असून, देशभक्तीची प्रभावी मांडणी आणि भावनिक प्रसंग प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. हाच भावनिक कनेक्ट चित्रपटाच्या यशामागील प्रमुख कारण ठरत आहे.
अॅडव्हान्स बुकिंगमध्येही तुफान प्रतिसाद
‘बॉर्डर 2’ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येही जबरदस्त कामगिरी केली होती. रिलीजच्या एक दिवस आधीच सुमारे 4 लाख तिकिटांची विक्री झाली होती. पुढील 24 तासांत ही संख्या दुप्पट झाली. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या कमाईबाबत मोठे अंदाज वर्तवले जात होते.
ट्रेड वेबसाइट Sacnilk च्या अहवालानुसार, ‘बॉर्डर 2’ने पहिल्याच दिवशी अंदाजे 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अंतिम आकडे अद्याप समोर यायचे असले तरी, या कमाईसह चित्रपटाने ‘धुरंधर’चा 28 कोटींचा ओपनिंग डे रेकॉर्ड मोडला आहे. विशेष म्हणजे, ‘धुरंधर’ने दुसऱ्या आठवड्यापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त मुसंडी मारली होती आणि आजही अनेक थिएटरमध्ये यशस्वीपणे सुरू आहे.
वीकेंडला 100 कोटींचा टप्पा?
ट्रेड तज्ञांच्या मते, नाइट शोजमध्ये मिळणाऱ्या प्रतिसादामुळे ‘बॉर्डर 2’ची पहिल्या दिवसाची कमाई 35 ते 40 कोटींपर्यंत पोहोचू शकते. अनेक ठिकाणी थिएटर हाऊसफुल्ल असून, आता या चित्रपटाला पहिल्याच वीकेंडला 100 कोटींचा टप्पा पार करता येतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्टारकास्ट आणि कथा
1997 साली प्रदर्शित झालेल्या जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’चा हा सिक्वेल असून, यावेळी कथानक 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. चित्रपटात ऑपरेशन चंगेज खानदरम्यानची लढाई प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. पहिल्या ‘बॉर्डर’मध्ये लोंगेवाला युद्ध दाखवण्यात आले होते.
या चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. दमदार अभिनय, भव्य युद्धदृश्ये आणि देशभक्तीची भावना यामुळे ‘बॉर्डर 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत असल्याचे चित्र दिसत आहे.







