नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
कृषीमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे लक्ष घालणार असून, त्या तक्रारींची नियमीत समीक्षा करतील. पीएम किसान पासून इतर सर्व कृषी विषयक तक्रारी एकाच मंचावर नोंदवता येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तक्रारी मांडण्यासाठी विविध यंत्रणेकडे भटकंती करावी लागणार नाही. तक्रारींचा निपटारा विहित मुदतीत होणे अनिवार्य राहील.
तक्रारींसाठी स्वतंत्र पोर्टल
दिल्लीत घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत कॉल सेंटर्स आणि हेल्पलाईनवर येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर स्वतंत्र पोर्टल उभारण्याचा निर्णय झाला. या पोर्टलवर नोंदवलेल्या तक्रारींची कार्यवाही शेतकऱ्यांना कळवली जाईल. कोणत्याही प्रकारची हयगय होऊ नये, असे निर्देश कृषीमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात २ ऑगस्ट रोजी जमा झाला होता. आता शेतकऱ्यांना २१ व्या हप्त्याची आतुरता आहे. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दर चार महिन्यांनी हप्ता वितरित केला जातो. एका वर्षात एकूण तीन हप्ते मिळतात आणि प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. काही वृत्तांनुसार हा हप्ता नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये मिळू शकतो.
———————————————————————————————–