मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
एसटी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आता सेवा निवृत्तीनंतर या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे सवलती घेताना कोणतीही अडचण येणार नाही. सध्या एसटी महामंडळात सुमारे ४० हजार निवृत्त कर्मचारी आहेत. या निर्णयामुळे त्यांना विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.
मोफत पास १२ महिन्यांसाठी
एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. यापुढे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारा मोफत प्रवास पास ९ ऐवजी थेट १२ महिन्यांसाठी मिळणार आहे. विशेष म्हणजे, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नींसाठी देखील वर्षभर मोफत पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महागाई भत्त्यात वाढ
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली होती. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर मिळणारा महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून थेट ५३ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. ही वाढ जून महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे.
अपघाती विमा कवच
यासोबतच, महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक पर्याय निवडून कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
या सर्व निर्णयांमुळे एसटी महामंडळातील सेवा निवृत्त तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे चित्र यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
—————————————————————————————



