मुंबई : विशेष प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी पंढरपूर येथे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन केले. मात्र, विधान भवन परिसरात बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. आंदोलनकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंदोलन कशासाठी ?
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकार येऊन सहा महिने झाले तरी सुद्धा शेतकरी कर्जमाफी झाली नाही. दिवसागणिक शेतकरी आत्महत्या वाढताहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही. पिकांना हमीभाव दिला जात नाही. तसेच बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत. बँका कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना जोर-जबरदस्ती करताहेत. या सर्वांच्या विरोधात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन केले.
सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. या आंदोलनात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि नेते सहभागी होते. विधान भवन परिसरातील मुख्य प्रवेशद्वारात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तिथे आंदोलन करण्यास मिळणार नाही, म्हणून विधान भवन इमारतीच्या बाजूला असलेल्या एसबीआय बँकेच्या गेटवर चढून विधान भवनाच्या आत जाण्याचा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच शेतकऱ्यांची जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू. असा इशारा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
—————————————————————————————