Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ७३ लोको पायलट (मेल) यांनी कामाच्या वाढत्या ताणतणावाला आणि प्रशासकीय जाचाला कंटाळून एकाच वेळी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे संयुक्त अर्ज देत त्यांनी सेवेतून मुक्त करण्याची मागणी केली.

लोको पायलट्सनी अर्जात नमूद केले आहे की, त्यांनी रेल्वेला प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि समर्पित सेवा दिली असतानाही त्यांना आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या प्रशासकीय कार्यपद्धतीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही कामाचा ताण आणि प्रशासनाचा जाच कायम असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सततच्या तणावपूर्ण कामामुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाकडून असंवेदनशील वागणूक मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या परिस्थितीचा त्यांच्या कौटुंबिक जीवनावरही विपरीत परिणाम होत असल्याचे अर्जात म्हटले आहे.

विश्रांतीगृहातील निकृष्ट दर्जाचे जेवण, अस्वच्छता, अपुरी मूलभूत सुविधा, पुरेशा विश्रांतीचा अभाव तसेच लॉबी, ट्रिप शेड आणि रनिंग रूममधील गैरसोयी यांचाही पाढा लोको पायलट्सनी वाचला आहे. एकाच वेळी ७३ जणांनी स्वेच्छानिवृत्तीचा पवित्रा घेतल्याने मध्य रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here