कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्ययावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.
सन- २०२५-२६ साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत नऊ क्रीडा प्रबोधनीमध्ये सरळ प्रवेश ५० टक्के व कौशल्य चाचणी ५० टक्के प्रक्रियेंतर्गत पुढील निकषांनुसार निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत. यासाठी पात्र खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे २४ जून २०२५ पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
प्रवेश प्रक्रीयासाठी नियम अटी व शर्ती पुढीलप्रमाणे –
राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली अशा 9 ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. या ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीमध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.
- सरळ सेवा प्रक्रिया- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय १९ वर्ष आतील आहे, अशा खेळाडूंना खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.
- खेळनिहाय कौशल्य चाचणी- क्रीडा प्रबोधिनीत असलेल्या खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय १९ वर्ष आतील आहे, अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो.
- वैद्यकीय चाचणी- चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाव्दारे चाचणी घेवून क्रीडा प्रबोधिनीमध्ये शारीरिक दृष्ट्या सुदृढ खेळाडूंची निवड अंतिम करण्यात येते. या चाचण्या जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत.
- जिल्हास्तर- जिल्हास्तरावर क्रीडा प्रबोधिनी विभाग चाचणीसाठी सहभागी होणाऱ्या खेळांडूची नाव नोदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी खेळाडूंनी नाव नोंदणी दिनांक २४ जून २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर या ठिकाणी करावी. सोबत पासपोर्ट साईज फोटो, जन्माचा दाखला, आधार कार्ड व खेळातील कामगिरी प्रमाणपत्र इ. कागदपत्राची झेरॉक्स प्रत असणे आवश्यक आहे.
सन 2025-26 प्रवेश प्रक्रिया क्रीडा कौशल्य व सरळ प्रवेश चाचणी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे.
- सरळप्रवेश – खेळ – हॅण्डबॉल, जलतरण, फुटबॉल, ज्युदो जिम्नॅस्टिक्स, सायकलींग.
- वयोमर्यादा – दिनांक ७ जुलै २००६ नंतर जन्मलेले व दिनांक ८ जुलै २०२५ पर्यंत १९ वर्ष पूर्ण झालेले खेळाडू.
- कौशल्य चाचणी –खेळ- हॅण्डबॉल, जलतरण, फुटबॉल, ज्युदो जिम्नॅस्टिक्स, सायकलींग
- वयोमर्यादा – दिनांक ७ जुलै २००६ नंतर जन्मलेले व दिनांक ८ जुलै २०२५ पर्यंत १९ वर्ष पूर्ण झालेले खेळाडू
विभागस्तर सरळ प्रवेश व क्रीडा कौशल्य चाचणीचे आयोजन दिनांक २८ ते २७ जून २०२५ दरम्यान आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. तरी जिल्हयातील खेळाडूंनी क्रीडा प्रबोधिनीकरिता होणाऱ्या प्रवेश चाचणीत सहभागी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडे दिनांक २४ जून २०२५ पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
—————————————————————————————————–



