कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
- नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोर्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करणार आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूराच्या अतिरिक्त पाण्याचा प्रश्न कालव्याच्या माध्यमातून पाणी मराठवाड्यात आणून सोडण्यासाठी जागतिक बँकेचे सहाय्य घेण्यात आले आहे. पुढील महिन्यात प्रकल्पावर काम सुरू होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
हिंगोली जिल्ह्यातील २७१ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी पार पडला. या वेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, आमदार तान्हाजी मुटकुळे, रामराव वडकुते, बाबाराव बांगर, फुलाजी शिंदे, कैलास काबरा आदी उपस्थित होते. ‘मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नदी जोड प्रकल्पाद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणले आहे. तसेच फ्लड डायव्हर्जन प्रकल्प राबविला जाणार असून पुराचे पाणी मराठवाड्यात आणले जाईल. त्यासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे,’ असे फडणवीस म्हणाले.
हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव दिले जाईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे आणि संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ नर्सी नामदेव येथे विकासकामांसाठी निधी देण्याचे येईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले. महिलांची सहकारी संस्था स्थापन करून बहिणींना मिळणार्या पैशातून कर्ज उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे फडणवीस म्हणाले.



