The Balumama Temple in Adamapur (Bhudargad taluka) will be closed for a few days for cleaning on the occasion of the Sharadiya Navratri festival.
आदमापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर ( ता. भुदरगड ) येथील बाळूमामा देवालय शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त स्वच्छतेसाठी काही दिवस बंद राहणार आहे. भाविकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि व्यवस्थित वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने देवालय समितीने मंदिर परिसर, भक्तनिवास व अन्नछत्राची संपूर्ण स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वच्छतेच्या अनुषंगाने मंदिर शनिवार, दि. १३ सप्टेंबर ते मंगळवार, दि. १६ सप्टेंबर अखेर बंद राहील. या कालावधीत भाविकांनी मंदिरास भेट न देता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर बुधवार, दि. १७ सप्टेंबर पासून मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार असून नवरात्र उत्सवाची सुरुवात भव्य स्वरूपात होणार आहे.
ही माहिती बाळूमामा देवालयाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, अध्यक्ष धैर्यशील भोसले, सचिव रावसाहेब कोणकेरी तसेच देवालय समितीने दिली. भाविकांनी मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यास आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
स्वच्छतेमुळे मंदिर परिसरातील पवित्रता टिकून राहील आणि उत्सव काळात येणाऱ्या भाविकांसाठी अधिक सोयीचे व सुरळीत दर्शन होईल, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व समितीने आवश्यक ती तयारी सुरू केली असून भाविकांनी वेळेचे भान ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.