कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारतीय संरक्षण क्षेत्राच्या स्वावलंबनाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भारतीय हवाई दलासाठी तब्बल ६२ हजार कोटी रुपयांच्या ९७ स्वदेशी तेजस मार्क 1ए लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली. या उच्चस्तरीय बैठकीत झालेल्या निर्णयामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (HAL) मोठी ऑर्डर मिळाली असून उत्पादन प्रक्रियेला आता वेग येणार आहे.
या घडामोडींचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. बुधवारी एचएएलचे शेअर्स बीएसईवर ३.५ टक्क्यांनी वाढून ४६११.६० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले, तर भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) चे शेअर्स १.३५ टक्के वाढून १५७०.४५ रुपयांवर पोहोचले.
ही तेजससाठीची दुसरी मोठी खरेदी ठरणार आहे. याआधी काही वर्षांपूर्वी सरकारने ८३ तेजस विमानांसाठी सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचा ऑर्डर दिला होता. या ताज्या करारामुळे हवाई दलाकडे एकूण १८० तेजस मार्क 1ए जेट्स उपलब्ध होतील.
संरक्षण सूत्रांच्या मते, ही विमाने जुन्या होत चाललेल्या मिग-21 फ्लीटची जागा घेणार आहेत, ज्यांना हवाई दल टप्प्याटप्प्याने सेवेतून कमी करत आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे भारताचे संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबन बळकट होईल आणि शेकडो लघु व मध्यम उद्योगांना पुरवठा साखळीत सहभागी होण्याची मोठी संधी मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देत असून, एचएएलला गेल्या काही वर्षांत विमाने, हेलिकॉप्टर आणि इंजिनसाठी अनेक करार मिळाले आहेत. अलिकडेच संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.६ लाख कोटी रुपयांच्या अतिरिक्त प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामध्ये 156 LCH हेलिकॉप्टरची खरेदी आणि 84 Su-30MKI लढाऊ विमानांचे अपग्रेड यांचा समावेश आहे.
तेजस लढाऊ विमान प्रथमच २०१६ मध्ये हवाई दलात दाखल झाले. सध्या दोन स्क्वॉड्रन या विमानांचा वापर करत आहेत. ताज्या मंजुरीनंतर तेजस मार्क 1ए येत्या काही वर्षांत भारतीय हवाई दलाच्या लढाऊ ताफ्याचा कणा बनण्याची अपेक्षा आहे.
—————————————————————————————————