कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
भारताचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांचे दारापूर, अमरावती या गावात आगमन होताच संपूर्ण दारापूर गाव आनंदात न्हालं. सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रथमच आपल्या मूळगावी आलेल्या गवई यांचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी त्यांनी निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करत, “निवृत्तीनंतर अधिकाधिक वेळ दारापूर, अमरावती आणि नागपूरमध्ये घालवणार आहे,” असे सांगितले.
गावात प्रवेश करताच फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी, ढोल-ताशांच्या गजरात गवई यांचे स्वागत करण्यात आले. जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी आपल्या बालपणीच्या घराला भेट दिली तसेच विकंदर महाराज, राजे बुवा महाराज आणि हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय” च्या घोषणांनी स्वागत करत त्यांचा अभिमान व्यक्त केला. गवई म्हणाले, “दारापूर हे एकोप्याचं आणि शांततेचं प्रतीक आहे. इथं परत आलं की मनाला फार समाधान मिळतं.”
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा थोडक्यात परिचय
जन्म : २४ नोव्हेंबर १९६०, अमरावती, महाराष्ट्र
प्राथमिक शिक्षण : अमरावती
वकिलीची सुरूवात : १६ मार्च १९८५
स्वतंत्र वकिली : १९८७–१९९०, मुंबई उच्च न्यायालय व नंतर नागपूर खंडपीठ
राज्य सेवा :
१९९२-९३ – सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त लोक अभियोक्ता, नागपूर.
१७ जानेवारी २००० : नागपूरसाठी सरकारी वकील व लोक अभियोक्ता
न्यायिक कारकीर्द :
१४ नोव्हेंबर २००३ : मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश
१२ नोव्हेंबर २००५ : कायमस्वरूपी न्यायाधीश
२४ मे २०१९ : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
२०२५ : भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आपले, स्पष्ट विचार आणि सामाजिक जाणिवेच्या माध्यमातून न्याय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या अभिमानास्पद वाटचालीचा गावकऱ्यांनी भरभरून आनंद साजरा केला.
——————————————————————————–



