कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या पुनर्वसनाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने चार महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये ‘ श्रृंखला ’ उपहारगृह, ई-मुलाखत व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा, कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री केंद्र आणि भारत पेट्रोलियमच्या सहकार्याने उभारला जाणारा पेट्रोल पंप यांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे कळंबा जेल आधुनिकतेकडे वाटचाल करत असून, सुरक्षा, स्वावलंबन आणि सुविधा या त्रिसूत्रीचा यशस्वी संगम साधला जात आहे.
‘ श्रृंखला ’ उपहारगृह
केरळमधील मॉडेलवर आधारित ‘श्रृंखला’ उपहारगृहाची इमारत कळंबा कारागृह परिसरात उभारली गेली असून लवकरच उपहारगृह कार्यान्वित होणार आहे. खुल्या कारागृहातील २० निवडक कैद्यांच्या माध्यमातून हे उपहारगृह चालवले जाणार असून, नागरिकांना येथे चविष्ट खाद्यपदार्थांच्या बरोबरच कैद्यांच्या सेवाभावाचीही अनुभूती घेता येणार आहे.
ई-मुलाखत
सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयीन सुनावणीसाठी सध्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर केला जातो, त्याच धर्तीवर आता कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी ई-मुलाखतीची सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येत असून, हे तंत्रज्ञान केवळ संवादापुरते मर्यादित न राहता मानसिक आधारही देणारे ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
हस्तकला विक्री केंद्र
कैद्यांच्या हस्तकलेला व्यासपीठ मिळावे आणि त्यातून त्यांना उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध व्हावा यासाठी कारागृहातच स्वतंत्र विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यात लाकडी वस्तू, शिवणकामाचे साहित्य, रुमाल, कपडे आदी वस्तू विक्रीस ठेवण्यात येणार आहेत. यामुळे कैद्यांच्या आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन मिळणार असून, त्यांची उत्पादने थेट समाजापर्यंत पोहोचणार आहेत.
कारागृह परिसरात सध्या ७०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोबाइल जॅमर कार्यरत आहेत. कैद्यांना गरम अन्न मिळावे यासाठी १०० ‘ हॉटस्पॉट ’ स्वयंपाकघरांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. या सर्व आधुनिक उपाययोजनांमुळे कारागृहाची सुरक्षा अधिक बळकट होत असून, कैद्यांना गरजेनुसार सुविधा पुरवण्यावर भर देण्यात आला आहे.
आमच्या यू ट्यूब चॅनेललाही भेट द्या….👇



