कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. एकीकडे महावितरणने वीज दरवाढ लागू करत असल्याच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच, राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात एक महत्त्वपूर्ण घोषणा करत जनतेला मोठा दिलासा दिला आहे. जे ग्राहक शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरतात त्यांना २६ टक्के शुल्क कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ राज्यातील कोट्यवधी वीज ग्राहकांना मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात वीज बिल कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की घरगुती वापरासाठी दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना आता सवलतीच्या दराने वीज मिळणार आहे. या निर्णयामुळे साधारणपणे दरमहिना ५०० ते ६५० रुपयांच्या वीजबिलात २० टक्के ते ३० टक्के पर्यंत कपात होणार आहे. त्याचबरोबर, सरकारने स्पष्ट केलं आहे की, पुढील कित्येक वर्षांपर्यंत (किमान ५ वर्षे) वीज दरात कोणतीही वाढ होणार नाही. त्यामुळे जनतेला दीर्घकालीन आर्थिक लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सांगितले, ” महावितरणचे राज्यात एकूण २ कोटी ८० लाख ग्राहक आहेत. राज्यातील ७० टक्के ग्राहकांचा वीज वापर हा १०० युनिटपेक्षा कमी आहे. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या खिशाला झळ बसू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. वीज ही जीवनावश्यक सेवा असून, ती परवडणारी असणे गरजेचे आहे.”
राज्य शासनाने जाहीर केलेली वीज बिलातील सवलत योजना एक प्रकारे वीज बचतीची सवय लावणारी आहे. शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या २० ते ३० टक्के दरात सवलत असल्यामुळे कमी लाईट बील येण्यासाठी ग्राहक कमी वीज वापरण्याचा प्रयत्न करेल, यामुळे वीज बचत होईल.