मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) मध्ये नेतृत्व पातळीवर मोठा बदल झालाय. मागील २५ वर्षांपासून पक्षात कार्यरत असलेले ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी अखेर आपल्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा मंगळवारी (१६ जुलै) राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयानंतर पक्षात नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप सुरु झाले असून आमदार रोहित पवार यांच्यावर पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ही घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडिया (X) पोस्टद्वारे केली आहे. त्यांनी रोहित पवार यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कामाची पद्धत, विचारधारा आणि संघटनात्मक क्षमतेवर भर दिला आहे.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट
“नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे. रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल, याची खात्री आहे. स्व. यशवंतराव चव्हाण आणि आदरणीय पवार यांच्या विचारांचा वस्तुपाठ डोळ्यांसमोर ठेवून ते काम करीत आहेत. नूतन प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची शिव-फुले-शाहू-आंबेडकर ही वैचारिक चौकट अधिक भक्कम करण्यासाठी ते सदैव कार्यरत राहतील, असा विश्वास आहे. त्यांचे या नवीन जबाबदारीबद्दल हार्दिक अभिनंदन, तसेच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”
नवीन संघटनात्मक संघटनेची नांदी
जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर शरद पवार यांनी नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची निवड केली आहे. तर दुसरीकडे, रोहित पवार यांच्यावर सरचिटणीस पदाची आणि सर्व फ्रंटल व सेलच्या प्रभारीपदाची धुरा सोपवली गेली आहे. यामुळे पक्षात नव्या पिढीला संधी देण्याचा शरद पवारांचा निर्धार स्पष्ट झाला आहे.
रोहित पवार हे करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून पक्षाच्या युवा नेतृत्वात त्यांचा प्रभाव वाढत आहे. आता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी मिळाल्याने, आगामी काळात ते पक्षासाठी निर्णायक भूमिका बजावतील, अशी अपेक्षा आहे. या नेतृत्वबदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुन्हा एकदा नव्या जोमाने उभारी घेणार का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले
——————————————————————————————————-