कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (इपीएफओ) अलीकडेच आपल्या सदस्यांसाठी म्हणजेच नोकदारांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) काढण्याचे नियम सुलभ केले आहेत. या नव्या बदलामुळे घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पगारदार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
नवीन नियमानुसार, आता नोकरदारांना आपला पीएफ बॅलन्स घर खरेदीसाठी अधिक प्रमाणात काढता येणार आहे. याअंतर्गत कर्मचारी त्यांच्या इपीएफ खात्यातील ९० टक्के पर्यंत रक्कम घर खरेदी, फ्लॅट घेणे किंवा घर बांधण्यासाठी काढू शकतात. ही सुविधा त्या कर्मचाऱ्यासाठी आहे ज्यांनी किमान ५ वर्षे सलग नोकरी केली आहे.
याआधी सदस्यांच्या खात्यावरच रक्कम जमा केली जात होती. पण आता इपीएफओ संबंधित बिल्डर, विकासक किंवा गृहनिर्माण संस्थेला थेट पैसे ट्रान्सफर करता येतील. यामुळे व्यवहार पारदर्शक व जलद होतील. इपीएफओच्या ई-सेवा पोर्टलवरून ही प्रक्रिया आता ऑनलाइन करता येते. सदस्यांना फॉर्म ३१ भरून त्यासाठी अर्ज करता येतो.
वित्तीय सल्लागारांच्या मते, “घर खरेदी करताना इपीएफ मधून रक्कम काढणे हा पर्याय शाश्वत व किफायतशीर ठरतो. हे कर्ज घेण्यापेक्षा कमी व्याजदर्शक पर्याय असू शकतो.”
ऑनलाइन दाव्यासाठी चेक किंवा बँक पासबुकची सत्यापित छायाप्रत अपलोड करण्याची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे. इपीएफ खाते युएएनशी लिंक करताना बँक खातेधारकाचे नाव सत्यापित केले जात असल्याने आता चेक किंवा पासबुकची सत्यापित प्रत आवश्यक नाही.
याशिवाय, बँक खाते सीडिंग प्रक्रियेमुळे आता बँक खाते पडताळणीमध्ये नियोक्त्याची भूमिका संपुष्टात येईल. या सोप्या प्रक्रियेचा फायदा अशा सदस्यांनाही होईल जे त्यांचे विद्यमान बँक खाते तपशील अपडेट करू इच्छितात. ते आता त्यांचा नवीन बँक खाते क्रमांक आणि आय एफएससी कोड प्रविष्ट करून हे करू शकतात, ज्याची पुष्टी आधार ओटीपीद्वारे केली जाईल. तसेच आगाऊ दाव्यांसाठी ऑटो-सेटलमेंट मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. याआधी फक्त १ लाख रुपये मर्यादा होती जी आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे लोकांना ७२ तासांच्या आत जलद पैसे मिळू शकतील.
——————————————————————————————–