कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
चंदगड विधानसभा मतदारसंघातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग व्हावा, या मागणीसाठी आज गडहिंग्लज शहरात हजारो शेतकऱ्यांनी आपल्या सातबारा उताऱ्यांसह भव्य पदयात्रा काढली. या पदयात्रेत सहभागी होत शेतकऱ्यांनी महामार्गाला जोरदार पाठिंबा दर्शवला. चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडे शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी मिळवण्यासाठी अधिकृत पत्र दिले होते. त्यांच्या या पुढाकाराला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे, चारच दिवसांपूर्वी गडहिंग्लजमध्ये या महामार्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन झाले होते. मात्र आजच्या आंदोलनात चित्र पूर्णपणे वेगळं पाहायला मिळालं.
पदयात्रेदरम्यान आमदार शिवाजी पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कठोर शब्दात टीका केली. “महामार्गासारख्या जनहिताच्या प्रकल्पाला विरोध करणारे नेते मॅनेज होणारे आहेत. त्यांच्याकडे दुसरं काही काम नाही म्हणून विरोध करत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.
पाटील हे अपक्ष असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या प्रकल्पाला सरकारची साथ लाभण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या पदयात्रेमुळे शक्तीपीठ महामार्गासंबंधी स्थानिक पातळीवर जनमत अधिक मजबूत झाले असून, पुढील काही दिवसांत या विषयावर अधिक चळवळी घडण्याची शक्यता आहे.
शक्तीपीठ महामार्गाला व्यापक विरोध : राजू शेट्टी
कोल्हापूर जिल्ह्यातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला व्यापक विरोध सुरू असतानाच, या प्रकल्पासाठी केवळ १% शेतकऱ्यांचाच पाठिंबा असल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
मुंबईत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत फक्त ३५ शेतकऱ्यांनीच आपले सातबारा उतारे शासनाकडे सुपूर्त केले असून, ही संख्या जिल्ह्यातील हजारो गटधारकांच्या तुलनेत नगण्य असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. “या ३५ जणांमध्ये माणगाव मधील सहा लोक होते, पण त्यातील केवळ तीन जणांचीच जमीन संपादित होणार आहे. उरलेले तिघे बुजगावणे म्हणून नेले होते,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
शेट्टी यांनी राजेश क्षीरसागर यांच्यावर ही टीकेची झोड उठवली. “ मुंबईत घेतलेल्या बैठकीत केवळ ३५ लोकांचा सहभाग दाखवून शासनाला दिशाभूल केली जात आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील ३,८२२ गटधारकांची सुमारे ५,३०० एकर जमीन संपादित होणार असून यात १० हजांरहून अधिक शेतकरी येतात. म्हणजे, फक्त १% लोकांचा संमतीपत्र शासनाकडे आहे. यावरून स्पष्ट होते की शक्तीपीठ महामार्गाला मोठा लोकविरोध आहे.”
शेट्टी यांनी सरकारवर टीका करताना तीव्र भावनिक आवाहनही केलं. “ ज्या पद्धतीने कोल्हापुरची करवीर निवासिनी अंबाबाई देवीने कोल्हासूर राक्षसाचा वध केला, त्याच पद्धतीने कोल्हापूर शहराला पुराच्या खाईत लोटणाऱ्या ‘शक्तीपीठ महामार्ग’ नावाच्या राक्षसाचा नाश आई अंबाबाईच करेल,” असे ते म्हणाले.
शेट्टी यांच्या या वक्तव्यामुळे महामार्गाच्या समर्थनार्थ निघालेल्या पदयात्रा आणि स्थानिक आमदार शिवाजी पाटील यांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. एकीकडे हजारो शेतकरी समर्थनार्थ रस्त्यावर उतरत असतानाच, दुसरीकडे मोजके शेतकरीच संमती देत असल्याचा आरोप विरोधी गट करत आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.आता पुढील काही दिवसांत सरकार काय भूमिका घेते आणि शेतकरी व लोकप्रतिनिधींमध्ये मतैक्य कसे साधले जाते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
——————————————————————————