राधानगरी : प्रतिनिधी
राधानगरी तालुक्याच्या पश्चिमे कडील गावांमध्ये काळ्या मातीतून धान्याचं सोनं उगवण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर राबणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करत देशी बेंदूर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.आज दिवसभर शेतकरी बैलांना सजवणे आणि त्यांना सुग्रास खाद्य भरवण्यात दंग होता. राधानगरी येथे पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली.
वर्षभर शेतामध्ये शेताची मशागत करण्यास शेतकऱ्यांना मदत करणारा, शेतकऱ्यांचा जिवाभावाचा सखा आणि सोबती असणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा महाराष्ट्रीयन बेंदूर सण राधानगरीत विविध उपक्रमांनी साजरा झाला. तालुक्याच्या पश्चिमेकडे शेतकरी रोपलागण करून भात पिक घेतात. भातपिकाच्या शेतीची बैल आणि यंत्रांच्या सहाय्याने मशागत करून रोपलागणी पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे बैलांना विश्रांती मिळाली असल्यानं महाराष्ट्रीय बेंदूर या तिथीला बैल पोळा साजरा करतात.
आज शेतकऱ्यांनी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घालून शेंदूर आणि आभूषणे घालून बैलांना सजवलं अनेक भागात बैलांच्या औतांची जागा आता यंत्रांनी घेतली आहे. त्यामुळे बैलांची संख्या कमालीची कमी झाली आहे. राधानगरी येथील सुधाकर साळोखे यांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात बैलांच्या मिरवणुकिच आयोजन केले होते.
राधानगरी शहरासह परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांसह सहभाग घेतला होता. धो धो पावसातही बैलांच्या मिरवणुकीचा मोठा उत्साह दिसून येत होता. यावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया साळोखे यांनी अलीकडं बैलांची संख्या घटल्याचं वास्तव मांडत बैल हा शेतीबरोबरच माणसांच्या आरोग्यासाठी विविध फायदे देणारा आहे. त्यामुळे भविष्यात बैलांची प्रजाती टिकवून ठेवणं हे शेतकऱ्यांच्या हती असल्याचे सांगितले. यावेळी सौरभ साळोखे, स्वप्निल साळोखे, अक्षय पोवार, धनाजी टिपुगडे, मनोज पारकर, राकेश मरगळे, अक्षय जोहार, अजित चौगले, कोंडीबा टिपूगडे, बंडा टिपुगडे, ओमकार बालनकर, स्वराज साळोखे यांच्यासह शेतकरी हाैशी बैलप्रेमी उपस्थित होते.
————————————————————————————