कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
अनाथ, निराधार व शिक्षणापासून वंचित असलेल्या अन्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी अन्न-वस्त्र-निवारा (अवनि ) ही संस्था सांगली येथे १९९४ साली प्रा. अरुण दत्तात्रय चव्हाण यांनी स्थापन केली. या संस्थेचे काम अनुराधा भोसले यांनी कोल्हापुरात सुरु केले. अनाथ, निराधार व शिक्षणापासून वंचित असलेल्या अन्य मुलांचा शोध घेत असताना जास्तीत जास्त कचरावेचक महिलांची मुले शिक्षणापासून वंचित आहेत असे आढळले. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कचरावेचक महिलांचे संघटन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील ३५०० कचरावेचक महिला संघटीत झाल्या आहेत. अवनिचे हे कार्य फार मोलाचे आहे.
महाराष्ट्रात कचरावेचक महिला ११ लाखांपेक्षा जास्त आहेत. या महिला अनेक वर्षांपासून कोंडाळ्यातील प्लास्टीक गोळा करून आपल्या कुटुबाचा उदरनिर्वाह करीत असुन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन हजारांपेक्षा जास्त कचरावेचक महिला आहेत. या महिलां असंघटित आहेत, अशिक्षित, अज्ञान आहेत. त्यांना शिक्षणाचे महत्त्व नाही, त्यांची मुलं शिक्षणाच्या प्रक्रीयेत नाहीत. त्यांच्या साठी तयार करण्यात आलेले कायदे कानुन याविषयी ते अनभिज्ञ आहेत.
कोंडाळ्यामधील भंगार गोळा करताना कचरावेचक महिला हातामध्ये हॅन्डग्लोज, मास्क, बुट घालत नाहीत. त्यामुळे अशा महिलांच्यात आजाराचे व त्वचा रोगाचे प्रमाण अधिक आहे. म्हणूनच अवनि संस्थेने कचरावेचक महिलांची पुढील पिढी कचरा वेचक होऊ न देणे, त्यांच्या मध्ये नेतृत्व गुण विकसित करुन आपल्या अधिकार मिळणेसाठी संघर्ष करणे, तसेच ८ एप्रिल २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन कायदा नुसार कचरा वेचक महिलांना कचरा वर्गीकरण कामात को.म.न.पा ने सामावून घेणे या उद्देशाने कचरा वेचक महिलांचे संघटन केले आहे. तसेच वस्तीपातळीवर अॅक्टीव्ह केडर नेमून त्यांच्या अधिकारांची जाणीव निर्माण करुन देण्याचे कामही सुरु केले आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊन संस्था गेली १५ वर्षे कचरा वेचक महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देणेसाठी कार्यरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १५ वस्त्यांमध्ये संस्थेने कचरा वेचक महिलांचे संघटन केले आहे. कचरावेचक महिलांना व त्यांच्या मुलांना आरोग्य विषयक सुविधा, विविध शासकिय योजनांचा लाभ, मुलांना शिक्षण देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे.
याचबरोबर कचरा वेचक महिलांना स्वंयरोजगार व रोजगार मिळवून देऊन त्यांची पुढील पिढी कचरावेचक होऊ न देणे या दृष्टीनेही ही संस्था करते. कोल्हापूर जिल्ह्यांतील कचरा वेचकांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवत असताना त्यांच्या सहभागातून घरगुती व सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्या पासुन खत व निरुपयोगी प्लास्टिकचा रस्ते बनविण्याच्या कामात पुनर्वापर हे पर्यावरणासाठी अत्यंत आवश्यक उपक्रम कचरावेचक महिलांच्या सहभागातून राबविले जात आहे.
—————————————————————————————-