कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेत जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या रणकंदनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने नियुक्त झालेले जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज स्पष्ट आणि आक्रमक भूमिका घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी थेट शिंदे गटावर, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर जोरदार टीका केली.
“जिल्ह्यात ठाकरेंचा पक्ष कोणाच्या दावणीला बांधू देणार नाही. जुगार अड्डा चालवणारे लोक आज पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि शिंदे गटाच्या नेत्यांसोबत फिरताना दिसत आहेत. अशा लेव्हलची भरती सध्या सुरू आहे, मात्र, आमच्या झंझावातात गद्दार सेना भविष्यात शिल्लक राहणार नाही” असे सांगत शिंदे गटाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
हर्षल सुर्वे यांचा शिंदे गटात झालेला प्रवेश, संजय पवार यांचा उपनेतेपदाचा राजीनामा यामुळे निर्माण झालेल्या नाराजीनाट्यावरही इंगवले यांनी भूमिका मांडली. “हे नाराजीनाट्य अद्याप संपलेलं नाही. मात्र, आज वरिष्ठांशी झालेल्या चर्चा सकारात्मक झाल्या आहेत. लवकरच ही नाराजी दूर होईल आणि सर्वजण एकदिलाने पक्षासाठी काम करतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी आपल्या राजकीय संघर्षाची आठवण करून दिली. “माझ्यासाठी राजकारण हा संघर्षाचा प्रवास आहे. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, उपमहापौर ही पदं मला सहज मिळाली नाहीत. एका खून प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, मी निर्दोष सुटलो. शहराच्या बाहेर राहूनही महापालिका निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आलो. मतदारसंघात प्रचार न करता निवडून येणारा मी शहरातील एकमेव उमेदवार आहे,” असा दावा त्यांनी केला.
“ माझी जिल्हाप्रमुख पदावर निवड ही विचारपूर्वक आणि ठाकरेंच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासातून झाली आहे. कोल्हापुरात शिवसेना बळकट करणे हेच माझं एकमेव ध्येय आहे. पक्षात कोणताही गट-तट ठेवायचा नाही. सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन आम्ही पुन्हा कोल्हापुरात पक्षाचं वर्चस्व प्रस्थापित करू, ” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
शहर आणि जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू असलेल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंगवले यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे आगामी काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
—————————————————————————————