अनिल जासुद : कुरुंदवाड
शिरोळ तालुक्यात पावसाची पूर्ण उघडीप असली तरी धरणपाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे २६ मे नंतर १७ व २२ जूनला पुन्हा कृष्णेचे पाणी श्री दत्त मंदिराजवळ आले. यानंतर पाणी पातळीत वाढ होत जाऊन २५ जून रोजी या मोसमातला पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. दरम्यान, १७ जून पासून आजअखेर कृष्णा नदीचे पाणी नृसिंहवाडी श्री दत्त मंदिराजवळच खेळत आहे. गेल्या दहा -पंधरा दिवसापासून कृष्णा-पंचगंगा नद्या आज अखेर पात्राबाहेरच असून शेकडो हेक्टर क्षेत्र अजूनही पाण्याखाली आहे.
कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा, वारणा आदी नद्या बाराही महिने दुथडी भरुन वाहतात. यामुळे शिरोळ तालुका सुजलाम..सफलाम, हरित क्रांतीचा सधन तालुका म्हणून प्रसिध्द आहे. अधिकृत आकडेवारीनुसार प्रत्येक वर्षी तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा नेहमीच कमी असते. या परिसरातील बहुतांशी शेती ही नदीकाठावरच वसलेली आहे.
कृष्णा – पंचगंगेच्या धरणपाणलोट क्षेत्रात सलग चार- पाच दिवस जरी दमदार पाऊस झाला तर तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागते. अशातच राधानगरी, कोयना, वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला तर तो पाऊस सरळ शिरोळ तालुक्यावर पुराचे संकट घेऊनच येतो. पावसाचे प्रमाण कमी असतानाही सन २००५, २०१९, २०२१ ला ” न भुतो न भविष्यती” असा महापूर आला होता. प्रत्येक वर्षी येणार्या पूराचा सामना शिरोळ तालुक्यातील जनता करीत आहे.
यावर्षीचीही परिस्थिती अशीच गंभीर दिसत आहे. मे महिन्याच्या अखेरीस सलग दहा बारा दिवस असा धूवाँधार पाऊस पडला की, धरणातून कोणत्याही प्रकारचा विसर्ग नसताना कृष्णा-पंचगंगेचे पाणी ऐन उन्हाळ्यात पात्राबाहेर पडले. परिणामी कधी नव्हे ते २६ मे रोजी कृष्णेचे पाणी नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिराजवळ येऊन गेले. मान्सूनपूर्व पावसानंतर जिल्ह्यासह धरणपाणलोट क्षेत्रात दमदार मान्सून पाऊस सुरु आहे. मात्र जिल्ह्यातील इतर तालुक्यापेक्षा शिरोळ तालुक्यात पावसाचे प्रमाण कमीच आहे. तरीही धरणपाणलोट क्षेत्रात सुरु असलेला पाऊस व राधानगरी, कोयना, वारणा आदी धरणातून विद्युत पायथागृहातून काही अंशी सुरु असलेला विसर्ग याचा परिणाम म्हणजे अनेक ठिकाणी पाणी शेतशिवारांतून तुंबून राहिले आहे.
गेले चार-पाच दिवस सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे. आतापर्यंत नद्यांचे पाणी पात्रात जायला हवे होते. मात्र तसे न होता तालुक्यातील कृष्णा-पंचगंगेची पाणी पातळी अतिशय संथ गतीने ओसरताना दिसत आहे. धरणपाणलोट क्षेत्रात उघडीप दिलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा जोर धरला आहे. बहुतांशी धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे धरणांची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी जर राधानगरी, कोयना, वारणा आदी धरणातून काही प्रमाणात सुरु असलेला विसर्ग वाढवला तर यापूर्वीच पात्राबाहेर असलेल्या शिरोळ तालुक्यांतील कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊन गंभीर पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
तालुक्यातील सर्वच नद्यांचे पाणी पुढे जाऊन अलमट्टी धरणाला मिसळते. अलमट्टी धरणाची उंची वाढल्यामुळे तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ कायम राहिली आहे. सध्या अलमट्टीने वेळेवर योग्य विसर्ग केला नाहीतर याच्या बॅकवाटरच्या फटक्यामुळे शिरोळ तालुक्यातील पुराचे रुपातंर महापुरात होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी प्रशासन स्तरावरुन त्वरीत व वेळेत योग्य नियोजन करावे लागणार आहे. सध्या विविध धरणांतून कोणत्याही प्रकारचा विशेष विसर्ग नसतानाही शिरोळ तालुका मात्र गेल्या दहा बारा दिवसापासून पुराच्या मगरमिठीत आहे.
———————————————————————————–