कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या विरोधात १२ जिल्ह्यांतील शेतकरी, शेतकरी संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत जोरदार आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणे–बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन होणार असून, या आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी करणार आहेत. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या सहभागाची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांचा संताप उफाळला
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो एकर शेतीवर गदा येणार असून, जमिनींच्या अधिग्रहणाबाबत स्पष्टता नसल्याने आणि शेतकऱ्यांना पुरेशा मोबदल्याचा विश्वास नसल्याने असंतोषाचा भडका उडाला आहे. अनेक गावांमध्ये याला विरोध होत असून, शेतकऱ्यांच्या मते हा महामार्ग थेट त्यांचा उदरनिर्वाह हिरावणारा ठरणार आहे.
राजकीय नेते आणि संघटनांची भूमिका
या आंदोलनात राजू शेट्टींनी उघडपणे प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहेत. काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनीदेखील महायुती सरकारवर जोरदार टीका करत, हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा असल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. विशेष म्हणजे आंदोलनाआधीच राजू शेट्टींच्या घरावर पोलीस फौजफाटा दाखल झाला असून, त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे. काही ठिकाणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईची शक्यता व्यक्त केली आहे.
सतेज पाटलांचा पोलिसांना इशारा
दरम्यान, कोल्हापूर आणि आसपासच्या भागात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पोलिसांनी जर बळाचा वापर केला, तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असा थेट इशारा दिला आहे.
“शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. जर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही गप्प बसणार नाही,” असे सतेज पाटील यांनी ठामपणे सांगितले.
रास्ता रोको आंदोलन किती वेळ चालेल आणि त्याचा काय परिणाम होईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पोलीस आणि आंदोलक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी संघटनांच्या मते, हा महामार्ग प्रकल्प थेट शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्याशिवाय हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे, कारण या आंदोलनातून सरकारवर दबाव निर्माण होणार की, पोलिसांच्या कारवाईत आंदोलन दडपले जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या आंदोलनाकडे लक्ष लागले असून, पुढील काही तासांत परिस्थिती आणखी तापण्याची शक्यता आहे.
——————————————————————————————