कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
वारीतील आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा
भान हरपून खेळ खेळतो,
दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा..
भक्तिने भारलेला रिंगण सोहळा
पाहावा ‘याचि देही याचि डोळा’
असे रिंगण सोहळ्यासंदर्भात म्हटले जाते. वारीतील सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा आहे. वारीत मराठा सरदार सहभागी होत होते. त्यांनीच रिंगण सोहळ्याची परंपरा सुरु केली. मराठा सरदार आपले लष्कर घेऊन वारीला येत होते. त्यावेळी त्यांनी वारीत रिंगण सोहळा सुरु केला. त्यामुळेच एखाद्या लष्कारी छावणीसारखी रिंगणाची रचना केली जाते. तसेच रिंगण लष्करी शिस्तीप्रमाणे पार पडते. या रिंगणाचे मुख्य आकर्षण असते अश्वांची दौड. त्यात दोन अश्व सहभागी होतात. यातील एका अश्वावर स्वार असतो तर दुसरा अश्व रिकामा असतो. त्या रिकाम्या अश्वावर संत बसतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मग चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात. त्यानंतर अश्व मोकळा सोडला जातो. हे अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात. त्यावेळी माउली, माउलीचा गजराने परिसर दुमदुमुन जातो. अश्वाची दौड हा रिंगणाचा कळस असतो. या रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी व विणेकरी हे स्वतंत्ररित्या धावतात.
वारीत बकरी रिंगणसुद्धा होते. संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यात मेंढरांचे रिंगण होते. या रिंगणामध्ये शेतकरी भाविक आपली मेंढरे घेऊन पळतात. ही मेंढरे रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात.
कोणकोणते रिंगण प्रसिद्ध आहेत:
-
सासवड, जेजुरी, लोणी, बारामती परिसरातील माळराने – इथे रिंगण सोहळे विशेष प्रसिद्ध आहेत.
-
पुण्याच्या वेशीवरचे रिंगण – खास आकर्षण मानले जाते.