मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून २०२५ या महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, जून महिन्याचा हप्ता ५ जुलै २०२५ पर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.
आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात ११ हप्त्यांचे म्हणजेच एकूण १६,५०० रुपये जमा करण्यात आले आहेत. मे महिन्याचा हप्ता ७ जूनच्या दरम्यान लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
तसेच, ज्या महिला पहिल्या टप्प्यात योजनेच्या लाभार्थी म्हणून नोंदणीकृत आहेत, त्यांनाच हे सर्व ११ हप्ते आणि त्यातून मिळणारे एकूण १६,५०० रुपये मिळाले आहेत. योजनेत नंतर नोंदणी केलेल्या महिलांना त्यांच्या नोंदणीच्या तारखेपासून हप्त्यांची गणना करण्यात येते.
राज्य शासनाने योजनेसंदर्भात जाहीर केलेल्या जीआरनुसार, ज्या महिलांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ मिळतो, त्यांना ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून केवळ ५०० रुपये मिळतात.
शासनाचं धोरण स्पष्ट आहे की, डीबीटी (Direct Benefit Transfer) मागे एका लाभार्थ्याला वर्षभरात एकूण १८ हजार रुपये मिळावेत. त्यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी निधीमधून वर्षाला एकूण १२ हजार रुपये मिळतात. त्यामुळे उर्वरित ६ हजार रुपये ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून देण्यात येतात. हे ६ हजार रुपये दरमहा ५०० रुपये या प्रमाणात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जातात.
७ ते ८ लाख महिलांना मिळतो ५०० रुपयांचा हप्ता
राज्यात सध्या सुमारे ७ ते ८ लाख महिलांना पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळतो. त्यामुळे या महिलांना ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून १५०० ऐवजी फक्त ५०० रुपये मिळतात.
महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीतील धक्का लक्षात घेऊन ही योजना आणली. त्यामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोठा फायदा महिलांना मिळत असला तरी काहींना केवळ ५०० रुपयांवर समाधान मानावं लागतं, ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
—————————————————————————————–



