मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा नियोजन विकास समित्यांमार्फत विकास करण्यात येत आहे. मात्र, सरकार स्थापनेला सहा महिने पूर्ण झाल्यानंतरही नाशिक आणि रायगड दोन जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेला नाही. परिणामी, या दोन्ही जिल्ह्यांचा विकास रखडला असल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले या दोघांनीही रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी दावा ठोकल्याने हे पद अद्याप कोणालाही देण्यात आलेले नाही. तर नाशिक जिल्ह्यांतही अशीच परिस्थिती असल्याने या जिल्ह्यालाही अद्याप पालकमंत्री पद देण्यात आलेले नाही. मंत्रिमंडळात याबाबत सातत्याने चर्चा होत असली तरी अद्याप कोणाचेही नाव निश्चित करण्यात आलेले नाही.
वास्तविक नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणि रायगडचे पालकमंत्री पद शिवसेना शिंदे गटाला देण्याचे तत्वतः ठरल्याची माहिती भरत गोगावले यांनीच दिली आहे. मात्र तटकरे यांनी याबाबत ताठर भूमिका घेतल्याने हा तिढा कायम आहे.
जिल्ह्यांचा विकास रखडला
दरम्यान, जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर सरकारकडून आलेल्या निधीचे नियोजन आणि वितरण करण्यात येते. नाशिक आणि रायगड हे दोन्ही जिल्हे मोठे असल्याने या जिल्ह्यांना एक हजार ते बाराशे कोटी रुपयांपर्यंतचा निधी येतो. मात्र, गेल्या सहा महिन्यात पालकमंत्री नियुक्त केले गेले नसल्याने डीपीडीसी ची बैठक झालेली नाही. परिणामी जिल्ह्यातील सर्व अंतर्गत विकास कामे रखडली असल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. याबाबतीत लवकरात लवकर तोडगा काढून संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना न्याय मिळावा ही मागणी जिल्ह्यांतून होत आहे.
——————————————————————————————-