कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील शेतकऱ्यांना शेतीकामासाठी शेतात जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अरुंद पायवाटा आणि गाडीवाटा यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतीसाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, बैलगाड्या किंवा माल वाहून नेणारी वाहने या अरुंद वाटांमुळे अडकल्याचे अनेकदा समोर आले आहे. यामुळे पेरणी, कापणी, माल वाहतूक आदी कामांमध्ये अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतरस्त्यांची रुंदी किमान ३ ते ४ मीटर असावी, असे स्पष्ट आदेश महसूल विभागाकडून देण्यात आले आहेत. हा निर्णय सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना आणि संबंधित महसूल अधिकाऱ्यांना कळवण्यात आला आहे.
राज्यातील शेतरस्त्यांची किमान रुंदी ३ ते ४ मीटर असावी याचबरोबर जिथे हे शक्य नाही तिथे पर्यायी रस्ते शोधण्याचे निर्देश महसूल विभागाने दिले आहेत. रस्ते करण्याची शेतकरी अर्ज करून स्थानिक महसूल अधिकाऱ्यांकडे मागणी करू शकतात. नवीन केलेल्या रस्त्यानुसार महसूल नकाशांमध्ये दुरुस्ती केली जाणार आहे.
महसूल विभागाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी मान्य झाली असून, यामुळे शेतीकामांना गती मिळणार आहे. विशेषतः कापसाची किंवा ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या निर्णयामुळे शेतातील रस्ते अधिक सुलभ, सुरक्षित आणि उपयोगी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांना काय करावे लागेल : संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आपल्या शेतासाठी असलेल्या रस्त्याची स्थिती स्पष्ट करून अर्ज करावा. गावातील ग्रामपंचायतीकडे अथवा महसूल कार्यालयात मागणी नोंदवावी.
महसूल विभागाचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक सकारात्मक पाऊल आहे. यामुळे केवळ शेतीकाम सुलभ होणार नाही, तर शेतमालाच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासही मदत होईल. भविष्यात या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे केली गेल्यास, ग्रामीण भागातील शेतीचा विकास वेगाने होऊ शकतो.
————————————————————————————