पन्हाळा : प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्याने माले येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने माले गावच्या ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
पन्हाळा आणि जोतिबाच्या पायथ्याशी असणाऱ्या माले येथील पाझर तलाव सुमारे २१ एकर परिसरात विस्तारला असून उन्हाळ्यात या तलावातील पाणी कमी झाले होते. त्यामुळे गावाला गेल्या काही महिन्यापासून आजही एक दिवस आड पाणी पुरवठा होतं आहे. मे महिन्याच्या दहा तारखेपासूनचं जोतिबा आणि पन्हाळ्याचा पूर्व भागातील डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्याने जुनच्या तिसऱ्या आठवड्यात माले गावचा पाझर तलाव भरला, त्यामुळे मालेगावच्या ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
गेल्या वर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तलाव भरला होता. तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात सांडव्यातून बाहेर पडू लागले आहे. त्यामुळे माले ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.