मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
सर्वसामान्य प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ( एसटी ) आजवरची सर्वात मोठी आणि लोकहिताची योजना जाहीर केली आहे. धार्मिक पर्यटनासाठी आता एसटीच्या माध्यमातून अत्यंत माफक दरात सहलींचे आयोजन केले जाणार असून यात प्रवास, निवास आणि भोजनाचा पूर्णसोयीसाठीचा समावेश असणार आहे.
विशेष बाब म्हणजे या सहलींसाठी एसटी महामंडळाने खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. यामुळे पर्यटकांना दर्जेदार सेवा, आरामदायक प्रवास आणि उत्तम व्यवस्थापनाचा लाभ मिळणार आहे. कमी गर्दीच्या दिवसांमध्ये सहली आयोजित करून यात्रेकरूंना शांततेत आणि मनसोक्तपणे धार्मिक स्थळांचे दर्शन घेता येईल.
राज्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा समावेश असलेल्या या सहलींमध्ये पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, अक्कलकोट, जेजुरी, देवीच्या शक्तीपीठांसह इतर ठिकाणांचा समावेश असणार आहे.
योजनेचे ठळक वैशिष्ट्ये :
-
अत्यंत माफक दरात संपूर्ण सहलीचा लाभ
-
एसटी महामंडळाच्या सुरक्षित व आरामदायक बस सेवा
-
खासगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या दर्जेदार निवास आणि भोजन व्यवस्था
-
कमी गर्दीच्या दिवसांत नियोजनबद्ध सहली
-
प्रवाशांच्या सोयीसाठी मार्गदर्शक व इतर सुविधा उपलब्ध
परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील धार्मिक पर्यटनाला नवे बळ मिळणार असून सामान्य नागरिकांनाही दर्जेदार पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक, सहलींचे तपशील आणि नोंदणी प्रक्रिया लवकरच एसटी महामंडळाकडून जाहीर होणार आहे.
——————————————————————————————-