कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी यावेळी सरकारला थेट २९ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून, त्या दिवसानंतर काहीही घडू शकते असा स्पष्ट इशारा दिला आहे.
मनोज जरांगे यांनी आपल्या आगामी आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली.
मराठा आणि कुणबी एकच आहेत. याची पुरावे आणि नोंदी आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे आता सरकारने हा कायदा तातडीने पारित करावा व सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासोबतच मी १४ जून पासून महाराष्ट्रातील सर्व आमदारांना फोन करणार आहे. अंतरवाली सराटीमध्ये आम्ही त्यांना बोलावणार आहोत. विधानपरिषदेतील आमदार, आजी-माजी आमदार, खासदार यांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत. सगेसोयरे मुद्द्याची अंमलबजावणीही तात्काळ करावी.
मुंबईत एकदा आलो तर परत जाणार नाही
सरकारने जर २९ ऑगस्टपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर पुढील टप्प्यातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. “मी गुलाल घेऊन येतो. २९ ऑगस्टपर्यंत काहीही बोलणार नाही. मात्र मुंबईला आलो तर परत जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला कडक इशारा दिला आहे.
राज्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आला असून आगामी काळात या प्रश्नावर काय तोडगा निघतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
————————————————————————————



