उत्तूर : प्रसारमाध्यम न्यूज
उत्तूर येथील शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालयात शिकण्यासाठी आणि या रुग्णालयात उपचारासाठी जगभरातील विद्यार्थी व नागरिक येतील. तसेच या महाविद्यालयातून योग व निसर्गोपचाराचे नामवंत तज्ज्ञ घडतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. राज्यातील पहिल्या शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रथम वर्ष बी.एन.वाय.एस. २०२४ – २५ च्या प्रवेशास प्रारंभ व उद्घाटन समारंभ मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते.
मंत्री ना. हसन मुश्रीफ – शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाचे मूळ कॉलेज उत्तूर मध्ये आहे. तथापि या महाविद्यालयाची इमारत पूर्ण होईपर्यंत सुरुवातीची दोन वर्षे ते बहिरेवाडी येथील जे.पी. नाईक स्मारकाच्या इमारतीमध्ये भरणार आहे. या महाविद्यालय व रुग्णालयासाठी २०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पंधरा एकर विस्तीर्ण जागेवर मुख्य रुग्णालय महाविद्यालय आणि प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. देशात यापूर्वी पाच योग महाविद्यालये असून उत्तुर येथील हे सहावे योग रुग्णालय देशातील अग्रेसर योग रुग्णालय बनेल, असा विश्वास व्यक्त करुन ते म्हणाले, या रुग्णालयामध्ये ४ हजारांहून अधिक रुग्णांना सेवा मिळणार आहे.
महाविद्यालयाची क्षमता ६० विद्यार्थ्यांची असून या ठिकाणी स्टाफ कॉर्टर्स, सुसज्ज ग्रंथालय, नॅचरोपॅथी थेरपीज केंद्र, ऑडिटोरियम, ट्रीटमेंट केंद्र, डायट सेंटर, स्विमिंग पूल, २०० मुलांचे व २०० मुलींचे वसतीगृह, चिकित्सा केंद्र, बहुउद्देशीय हॉल, योगासन हॉल, योगावर आधारित चालण्याचा ट्रॅक अशा विविध सुविधा असणार आहेत. २५२ कोटींच्या निधीचा राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र स्थापनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करण्यात आला असून तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त डॉ. राजीव निवतकर, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर व डॉ. मिलिंद निकुंभ यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.भाग्यश्री खोत यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालय स्थापनेबाबतची सविस्तर माहिती दिली. विवेक गवळी यांनी सूत्रसंचालन केले.
उपस्थिती- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे आयुक्त डाॅ. राजीव निवतकर, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर, नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, उत्तुर येथील शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी न. रा. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, किरण कदम, उत्तुरचे सरपंच किरण अमनगी, बहिरेवाडीच्या सरपंच सौ. रत्नजा सावंत, डाॅ. वीणा पाटील, नरसू पाटील, शिवाजीराव देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.
———————————————————————————