कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
खातेधारकांना बँकांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ अगदी सहजपणे घेता यावा यासाठी आरबीआयनं नियमावलीत आणखी सोप्या गोष्टींचा समावेश केला आहे. या नव्या आणि सुधारित नियमांमुळं आता खातेधारकांना दीर्घ काळापासून बंद असणारी बँक खाती आणि दावा न केलेली रक्कम पुन्हा मिळवता अथवा त्याच्याशी संबंधित व्यवहार करता येणार आहेत.
आरबीआयनं जारी केलेल्या निर्देशांअंतर्गत केवायसी नियमांमध्ये हे बदल करण्यात आले असून, आता बंद बँक खातं सुरू करण्यासाठी खातेधारकांना बँकेच्या शाखेत जिथं खातं सुरु केलं तिथं प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नसून के वाय सी अपडेट आता बँकेच्या कोणत्याही शाखेतून होणार आहे. इथं केवायसीसाठी फक्त होम ब्रांचची अट लागू नसेल.
व्हिडीओ कॉलच्या माध्यमातूनही बँक केवायसी
इतकंच नव्हे, तर खातेधारकांना व्हिडीओ कॉलच्या माध्यमातूनही बँक केवायसी करता येणार आहे. व्हिडीओ कस्टमर आयडेंटिफिकेशन असं या प्रक्रियेचं नाव असून विशेष स्वरुपात ही सुविधा ज्येष्ठ नागरिक, एनआरआय आणि ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी बरीच फायद्याची ठरणार आहे.
केवायसी न झाल्यासही व्यवहार करणं शक्य…
आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार रिझर्व्ह बँकेच्या मते आता बँकिंग कॉरस्पाँडंटना केवायसी अपडेशन किंवा पिरियोडिक अपडेशनची परवानगी राहील. आरबीआयच्या निर्देशांनुसार बँकांनी केवायसी प्रक्रियेसाठी ग्राहकांना किमान एकदा पत्राद्वारे संपर्क साधत त्याबाबतची सूचना देणं आणि किमान तीन आगाऊ सूचना देणं अनिवार्य असेल.
आरबीआयनं देशातील बँकांसह एनबीएफसीला आदेश देत ज्या ग्राहकांची केवायसी प्रक्रिया प्रलंबित असली तरीही अशा कमी जोखमीच्या ग्राहकांना बँक व्यवहारांची मुभा देण्याच्या सूचना केल्या आहेत. अशा ग्राहकांना केवायसी अपडेटसाठी ३० जून २०२६ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.